अभ्यासाच्या नावाखाली पालिका अधिकाऱ्यांची ‘पर्यटन शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:53 PM2018-06-29T13:53:46+5:302018-06-29T14:02:24+5:30
पिंपरी पालिकेचे काम बंद ठेवत पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन शहर विकासाचे नियोजन केले जाणार आहे....
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी काम बंद ठेवून पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन शहर विकासाचे कसले नियोजन करणार आहे. गरुडमाची हे मोठे पर्यटन स्थळ आहे.कार्यक्रम नियोजनात निसर्गदर्शनाचा हेतू अधिकाऱ्यांचा असण्याची शक्यता आहे. शहर परिवर्तन कार्यशाळेच्या नावाखाली पालिका अधिकारी दोन दिवस मुळशीतील गरुडमाची येथे जाणार आहेत. या पर्यटनाच्या ठिकाणी त्यांची कार्यशाळा होणार आहे. वास्तविक यशदा किंवा शहरातील आटो क्लस्टर, नाट्यगृहात देखील कार्यशाळा झाली असती. परंतु, मुळशीतील गरुडमाची या निसर्गस्थळी जाऊन पालिकेचे अधिकारी शहर नियोजन करणार की पर्यटन, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उपस्थित केला आहे.
सिटी ट्रान्फॉरमेशन आॅफिसच्या वतीने महापालिकेच्या पैशांतून कार्यशाळा आयोजित केली आहे. याबाबत भापकर म्हणाले, यशदा किंवा शहरातील महापालिकेच्या आॅटो क्लस्टर, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे, निळू फुले नाट्यगृह याठिकाणी देखील या कार्यशाळेचे आयोजन होऊ शकले असते.परंतु, अधिकाऱ्यांना मुळशीत जाऊन कार्यशाळा घेण्यात काय रस आहे. पालिकेचे काम बंद ठेवत पर्यटनाच्या ठिकाणी जाऊन शहर विकासाचे कोणते नियोजन केले जाणार आहे. कसले धोरण आखले जाणार आहे. गरुडमाची हे मोठे पर्यटन स्थळ आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात निसर्गदर्शन देखील ठेवले आहे. आयुक्तांना कसलेही व्हिजन नाही. स्मार्ट सिटी आणि शहर परिवर्तनाच्या नावाखाली ते करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत. कार्यशाळेला जाण्या-येण्यासाठी पन्नास आसनांची बस व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवासी वाहतूक खर्च वीस हजार रुपये होणार आहे. कार्यशाळेत कॉन्फरन्स हॉल, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम, मायक्रोफोन्स, स्लाईड चेंजर, व्हाईट बोर्ड, पाणी व्यवस्था, पन्नास जणांचे चहापान, दुपारचे व रात्रीचे जेवण, राहण्याची व्यवस्था, यासाठी अंदाजे एक लाख नव्वद हजार रुपये तसेच इतर खर्च पंधरा हजार असा एकूण सव्वा दोन लाख रुपये खर्च होणार आहे. हा खर्च रोख स्वरूपात करायचा असल्याने थेट पद्धतीने केला जाणार आहे.