भोसरीतील 'अर्बन स्ट्रीट 'ला व्यापाऱ्यांचा विरोध; मनमानी पध्दतीने काम सुरू असल्याचा केला आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:59 PM2020-09-10T19:59:33+5:302020-09-10T20:00:12+5:30
भोसरीतील नागरिकांच्या सोयी व सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार
भोसरी : भोसरीमधील वाहतूककोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासठी 'अर्बन स्ट्रीट ' करण्याचे प्रस्तावित असून , मात्र याला आता येथील व्यापारी व स्थानिक नागरिक व नगरसेवकांनी विरोध केला आहे. आम्हाला विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने हे काम सुरू असून, आमचे म्हणणे ऐका,आमच्या मागण्या मान्य करा असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याबाबत नुकतीच भोसरीमध्ये बैठक पार पडली.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, नगरसेवक रवी लांडगे, व्यापारी कैलास भाबुर्डेकर, नथु शिदे , भानुदास लांडगे, मदन कर्नावट ,राम फुगे, संजय उदावंत, स्थानिक नागरिक अजित रमेश गव्हाणे , बाळासाहेब लांडगे, हेमंत खराबे ,अविनाश फुगे,कैलास लांडगे, दत्तात्रेय गव्हाणे व अजित फुगे ,सागर काकडे तसेच इतर अनेक व्यापारी उपस्थित होते.
भोसरी पुलाखालील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आता या भागातील पादचाऱ्यांचा, नागरिकांच्या सोयीच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहेत. विदेशातील वाहतूक व्यवस्थेच्या धर्तीवर भोसरी उड्डाण पुलाखालील वाहतुकीचे 'अर्बन स्ट्रीट डिझाईन' संकल्पनेअंतर्गत नियोजन केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, गार्डन, ई- टॉयलेट आदी प्रकल्प हाती घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
मात्र आता व्यापाऱ्यांनी या प्रकल्पात मनमानी होत असल्याचा आरोप केला आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील फूटपाथची रुंदी वाढविली आहे. पुलाखाली पार्किंग करण्याचे नियोजन असताना आता हॉकर्स साठी जागा देण्याचे निश्चित केले आहे. हे प्रकल्पाच्या नावाखाली थोपविले जात आहे. असेही या व्यापाऱ्यांनी म्हटले आहे .
----
व्यापारी काय म्हणतात...
प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला मात्र विश्वासात घेतले नाही व्यापारी, जागामालक यांना कल्पना दिलेली नाही. काय कामे सुरू आहेत हे कामगार, अधिकारी दुकानाच्या समोर आल्यावर समजते. पुणे- नाशिक रस्त्यावर भविष्यात मेट्रो निओचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र हा प्रकल्प झाल्यानंतर पुन्हा हे काम बासनात गुंडाळून ठेवावे लागेल. दुकानासमोरील फूटपाथची रुंदी वाढविनार असून रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे त्यामुळे आम्हला व्यवसाय करताना अडचणी येणार आहे.
-------
आमच्या शंका, अडचणी आणि समस्या समजून घेतल्याशिवाय काम करू देणार नाही. नक्की हा प्रकल्प काय आहे हे समजून सांगावे, दुकाने, पथारी व्यावसायिक यांचे नुकसान होईल का हेही पाहावे लागेल. तोपर्यंत काम करू नये.
-रवी लांडगे
नगरसेवक ,
---------
मनमानी कारभार सुरू आहे, विरोध असताना रेटून नेऊन काम लादले जात आहे.पथारी व्यावसायिकाना उडडाणपुलाच्या खाली जागा देण्याचे नियोजन केले जात आहे . मग प्रस्तावित पार्किंगचे नियोजन कुठे करणार .
-अजित गव्हाणे
माजी स्थायी समिती सभापती
---------
या प्रकल्पाबाबत व्यापारी , स्थानिक नागिरक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल , प्रकल्प आराखडा समजून सांगू . त्यांचे समाधान झाल्याशिवाय काम करणार नाही .
एस. बी. साळी
उपअभियंता , पिंपरी चिंचवड मनपा