पारंपरिक खेळ झाले कालबाह्य, तंत्रज्ञान युगात बलतोय बालदिन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:48 AM2018-11-14T00:48:59+5:302018-11-14T00:49:30+5:30
तंत्रज्ञान युग : मोबाइल गेमकडे वाढला मुलांचा कल; आक्रसतेय शारीरिक क्षमता
मोशी : शहर व परिसरात शालेय विद्यार्थी, लहान मुले यांच्यात पारंपरिक मैदानी खेळाचा लोप पावत चालला असून, तंत्रज्ञानाच्या युगात केवळ मोबाइलवर गेम खेळण्याकडे कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वीच्या काळात पारंपरिक खेळाबरोबर मुले मैदानी खेळालाही विशेष प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शारीरिक व्यायामदेखील होत असे. पूर्वीचे पारंपरिक खेळ मोबाइलमधल्या गेममुळे कालबाह्य ठरले असून, आता फक्त त्यांच्या आठवणीच उरल्या आहेत. आजकालच्या मुलांना आट्या-पाट्या, सूरपारंब्या, विटी-दांडू, लगोरी, लपाछपी, भातुकली यांसारखे खेळ माहीतदेखील नाहीत. त्याऐवजी लहान मुलांना मोबाइल मधल्या अँग्री बर्ड, कँडी क्रश, टेम्पल रन, सबवे सर्फ यांसारख्या गेम पटकन लक्षात येत असून, त्याकडे जास्त कल असल्याचे दिसते.
आजकालच्या मुलांना आट्या-पाट्या, सूरपारंब्या, विटी-दांडू, लगोरी, लपाछपी, भातुकली यांसारखे खेळ सांगायला गेलात, तर ते तुम्हालाच ‘हे कोणते खेळ?’ असा उलट प्रश्न विचारतील. त्यांची तरी काय चूक, कारण आता ना ते खेळ राहिले ना खेळाचे क्रीडांगण. मात्र या खेळाबरोबर अनेक चांगल्या गोष्टी काळाआड जात आहेत.
सागर गोट्या, कानगोष्टी, सारिपाट, नवा व्यापारी, सापशिडी यांसारखे बैठे खेळ तर आता कोणी खेळतच नाही. आणि बुद्धिबळ, कॅरम, खो-खो, कबड्डी हे खेळदेखील स्पर्धांपुरतेच मर्यादित झाले आहेत. गावाता ठरावीक ठिकाणीच मैदानी खेळ खेळले जात असून, इतर खेळ कालबाह्य ठरत आहेत.
सुरुवातीच्या काळामध्ये खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, क्रिकेट यासारखे खेळ खेळण्याकडे मुलांचा कल असे; परंतु सध्याच्या युगामध्ये असे खेळ नावापुरतेच मर्यादित असून, गाव पातळीवरही लहान मुलांच्या हातात मोबाइल असल्याचे दिसून येते. लहान मुले मोबाइलवर तासन्तास गेम खेळण्यात मग्न असल्याचे दिसते. पूर्वीचे पारंपरिक खेळ मोबाइलमधल्या गेममुळे कालबाह्यच ठरले असून, आता फक्त त्यांच्या आठवणीच उरल्या आहेत.
खेळामुळे मुले घराबाहेर पडत. त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून नवनवीन खेळ ते स्वत: तयार करत व त्याचे नियमही ते स्वत: बनवत असत. त्यामुळे मुलांमध्ये नेतृत्वगुण वाढीस लागे व बौद्धिक क्षमतेला चालना मिळत असे. तसेच या जुन्या खेळांमुळे मिळणारा शारीरिक व्यायाम, एकाग्रता अशा अनेक गोष्टी व्हिडीयो गेममधून मुलांना कधीच मिळू शकत नाहीत. त्यामुळे पालकांनीही याकडे लक्ष देण्याची गरज असून, मुलाना मैदानी व पारंपरिक खेळाबाबत माहिती करून देणे गरजेचे आहे.