वाहतुकीला अडथळा; साहित्य रस्त्यावर पडल्याने अपघाताचा वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 02:56 AM2018-10-29T02:56:48+5:302018-10-29T02:57:00+5:30
जुना मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथे भरावाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या कामाचे आरई पॅनल रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
कामशेत : येथील जुना मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथे भरावाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या कामाचे आरई पॅनल रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय एखादे वाहन त्याला धडकून अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या उड्डाणपुलाचे काम मुदत संपूनही पूर्ण झाले नाही. शिवाय या कामाच्या संदर्भात मुख्य महामार्ग सेवारस्त्याने वळवण्यात आला. मात्र सेवारस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण होत आहे. त्यात सेवा रस्त्याच्या बाजूला करण्यात आलेल्या सांडपाण्याच्या गटारीवर चेंबर लावले नसल्याने उघड्या आहेत. पवनानगर फाटा पुढील दोन महिन्यांसाठी बंद केल्याने स्थानिक वाहनचालकांना विरुद्ध दिशेने मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे कामशेतच्या उड्डाणपुलाचे काम अजून किती दिवस सुरू राहणार असल्याचा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.
स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाहनचालकांना मोठा वळसा मारावा लागत आहे. या कामाचे तीन तेरा वाजले असून स्थानिक नागरिक, वाहनचालक व महामार्गावरील वाहतुकीस मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आरई पॅनलची पडझड सुरू
उड्डाणपुलाच्या कामासाठी भरावाच्या बाजूला लावण्यात आलेल्या आरई पॅनलची पडझड सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी सेवारस्त्यावर हे पॅनल आल्याने याचा वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. एखादे वाहन या रस्त्यावर आलेल्या पॅनलला धडकल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामशेत शहरात सुरू असलेल्या या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात अनेक त्रुटी असून, मुदत संपूनही हे काम पूर्ण झाले नसल्याने या कामाच्या संदर्भात शंका निर्माण झाली आहे.