बेकायदा पार्किंगने वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:13 AM2018-10-17T01:13:08+5:302018-10-17T01:13:32+5:30
पिंपरी : मुख्य रस्त्यावरील दुहेरी पार्किंग, रस्त्यावरील खड्डे, अरुंद रस्ते, पदपथावरील अतिक्रमणामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी वाढली आहे. पिंपरी ...
पिंपरी : मुख्य रस्त्यावरील दुहेरी पार्किंग, रस्त्यावरील खड्डे, अरुंद रस्ते, पदपथावरील अतिक्रमणामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी वाढली आहे. पिंपरी ते दापोडीपर्यंत बीआरटी व मेट्रोची कामे सुरु असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे ही समस्या अधिक बिकट झाली आहे. भोसरी चौक, नाशिकफाटा, कासारवाडी, खराळवाडी, मोरवाडी या ठिकाणची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांतर्फे मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यावरील स्थितीची लोकमत प्रतिनिधींनी केलेली ‘आॅन द स्पॉट’ पाहणी.
भोसरी रस्त्यावरील उड्डाणपूल आणि परिसरात वाहतूककोंडीची समस्या बिकट बनली आहे. दिघी, आळंदी रस्ता आणि राजगुरूनगर, खेडकडे जाणारे रस्ते भोसरीत पूर्वीच्या पीएमटी चौकात एकत्र येतात. या ठिकाणी पुलाखाली मोठ्या प्रमाणावर हातगाडी, पथारीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे आगोदरच्या वाहतूककोंडीत आणखी भर पडली आहे. रस्त्याच्या दुतर्फा पदपथावर हातगाडीवाल्यांची गर्दी झाल्याने सायंकाळी तर अक्षरश: जीव मुठीत घेऊन या रस्त्याने ये-जा करावी लागते.
खराळवाडी येथे वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. पिंपरीतील सिग्नल सुटल्यानंतर पुढे काही अंतरावर पुण्याच्या दिशेने वाहने जात असताना खराळवाडीत वाहतूककोंडी होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुढे गेल्यानंतर कासारवाडीपर्यंत वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड देत वाहनचालकांना मार्गक़्रमण करावे लागते.
नाशिकफाटा रस्त्यावर उड्डाणपुलाखाली वाहन दुरुस्तीची गॅरेज, हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने असल्याने कासारवाडी, नाशिकफाटा उड्डाणपुलाखाली जणूकाही वाहनतळ आहे. असाच भास होतो. उड्डाणपुलावरून वाहनांची वर्दळ कमी असली तरी उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहने दिसून येतात. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना तसेच पुण्याहून पिंपरी-चिंचवडकडे येणाºया वाहनांना उड्डाणपुलाखाली आल्यानंतर मेट्रो बीआरटीसाठी लावलेल्या बॅरिकेडसच्या अडथळ्यातून मार्ग काढत जावे लागते. भोसरीहून उड्डाणपुलाखालून येणारी वाहने, तसेच पिंपरीहून पुण्याकडे जाणारी वाहने उड्डाणपुलाखाली एकाच ठिकाणी एकत्रित येत असल्याने नेहमीच अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते. सिग्नलला थांबलेली वाहने एकाचवेळी सुटतात, पुढे पुण्याकडे जाणाºया मार्गावर अचानक गर्दी होते. पिंपरी-चिंचवडमध्ये सिग्नल यंत्रणा चांगली आहे. मात्र सिग्नलचा कालावधी मोठा असल्याने वाहने बराच वेळ एकाच जागी थांबून राहतात. पुणे- मुंबई महामार्गावर बीआरटी आणि मेट्रोची कामे सुरू आहेत. महामार्गावरून मध्येच आत येण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी ‘मर्ज इन, मर्ज आऊट’ नाही. त्यामुळे अनेक वाहनचालक उलट दिशेने काही अंतर वाहने नेतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. उलट दिशेने वाहने नेणाºयांवर कडक कारवाईचे धोरण वाहतूक पोलिसांनी अवलंबले आहे. मात्र ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले असल्याने सर्रासपणे उलट दिशेने वाहने नेली जात असल्याचे दिसून येते.