सायकल रॅलीच्या आयोजनामुळे बालेवाडीतील वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 08:48 AM2022-11-08T08:48:04+5:302022-11-08T08:49:27+5:30
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे...
पिंपरी : भारतीय निवडणूक आयोगातर्फे पुणे जिल्ह्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीच्या अनुषंगाने बुधवारी (दि. ९) सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून सकाळी सहाला रॅली निघणार आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून निघालेली सायकल रॅली पुणे विद्यापीठ व परत बालेवारी येथे येणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक वळविण्यात आली आहे. हिंजवडी वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीतील हा बदल बुधवारी पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेसाठी करण्यात आला आहे.
वाहतुकीतील बदल :
१) बालेवाडीकडून राधा चौकमार्गे बाणेरकडे जाणारी वाहने राधा चौकातून न जाता इतर मार्गांनी जातील.
२) न्याती शोरूमकडून सेवा रस्त्याने राधा चौकात येणारी वाहने ही मुख्य महामार्गावरून पुढे भुजबळ चौक (वाकडनाका) सेवा रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
३) भुजबळ चौकातून (वाकडनाका) सेवा रस्त्याने राधा चौकात येणारी वाहने ही राधा चौकात न येता इतर पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जातील.