Alandi | कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल; वाहनचालकांनो, पर्यायी मार्गाचा वापर करा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 09:44 AM2022-11-15T09:44:05+5:302022-11-15T09:44:39+5:30
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी केले आहे..
पिंपरी : आळंदी येथे १६ ते २३ नोव्हेंबरदरम्यान कार्तिकी यात्रा होत आहे. तसेच कार्तिकी एकादशीनिमित्त २० नोव्हेंबर व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त २२ नोव्हेंबरला आळंदी येथे राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व भाविक येतात. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी केले आहे.
कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदी आणि देहू येथे मोठ्या संख्येने वारकरी व भाविक दाखल होतात. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते. आळंदी येथील माऊली मंदिरातून सुरू झालेली दर्शनबारी देहूफाट्यापर्यंत येते. त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. दिघी-आळंदी, देहूरोड, तळवडे आणि चाकण वाहतूक विभागांतर्गत १६ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वाहतुकीत हे बदल केले आहेत.
जड वाहनांना प्रवेश बंदी
तळेगाव चाकण रस्त्यावरील देहूफाटा येथून देहूगावकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंदी आहे. वाहनचालकांनी चाकण -तळेगाव रस्त्यावरील एचपी चौकमार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच महिंद्रा सर्कलकडून आयटी पार्क, कॅनबे चौक येथे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंदी आहे. वाहनचालकांनी महिंद्रा सर्कलकडून निघोजे ते मोई फाटामार्गे इच्छित स्थळी जावे. या मार्गांवरून देहूकडे जाणाऱ्या जड वाहनांना १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान प्रवेश बंदी आहे. दिंडीतील वाहने व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना यातून वगळले आहे.
वाहतुकीत बदल खालीलप्रमाणे :
ठिकाण - पर्यायी मार्ग
१) मोशी चौक येथून नगरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद : जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी-आळंदी रस्त्याने मॅगझीन चौक मार्गे व मोशी-चाकण ते शिक्रापूर मार्गे.
२) भारतमाता चौक, मोशी येथून नगरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद : जयगणेश साम्राज्य चौक मार्गे, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी आळंदी रस्त्याने मॅगझीन चौक मार्गे व मोशी-चाकण ते शिक्रापूर मार्गे.
३) चिंबळीफाटा चौक, चाकण येथून नगरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद : जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, तसेच भोसरी-आळंदी रस्त्याने दिघी-मॅगझीन चौक मार्गे.
४) आळंदी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद : जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी-आळंदी रस्त्याने मॅगझीन चौक मार्गे.
५) चाकण-वडगाव घेणंद मार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद : कोयाळी कमान, कोयाळी- मरकळगाव मार्गे.
६) पुणे-दिघी मॅगझीन चौकाकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद : भोसरी-आळंदी रस्त्याने इच्छित स्थळी, तसेच अलंकापुरम-जयगणेश साम्राज्य चौक मार्गे.
७) मरकळकडून धानोरे फाटामार्गे आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद : धानोरेफाटा-चऱ्होली फाटा- मॅगझीन चौक, अलंकापुरम चौक मार्गे.
८) पुण्याकडून आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांना काळे कॉलनी, तापकीर चौक, चऱ्होली फाटा यापुढे जाण्यास प्रवेश बंद.
९) देहू कमान (जुना मुंबई-पुणे महामार्ग) येथून देहूगावकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद - भक्तीशक्ती चौक ते त्रिवेणीनगर मार्गे खंडेलवाल चौक ते देहूगाव.