मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा, रुग्ण, विद्यार्थ्यांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:40 AM2018-12-24T01:40:08+5:302018-12-24T01:40:15+5:30
पिंपरी शहरामध्ये पुणे- मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
पिंपरी : शहरामध्ये पुणे- मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या मधोमध बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. या अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. वाहनांची गर्दी वाढल्यामुळे चालकांमध्ये वादविवाद होतात.
मेट्रोच्या कामाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला आहे. रस्ते अरुंद झाल्यामुळे वाहनांची गर्दी होत आहे. बीआरटी मार्गामुळे मुख्य रस्ता अजूनच अरुंद झाला आहे. दापोडी ते चिंचवड स्टेशनपर्यंत मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या दरम्यानच्या प्रत्येक चौकात वाहतूककोंडी होते. पिंपरी येथील मोरवाडी चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सिग्नलच्या दोन्ही बाजूने रस्ता अरुंद झाला आहे. येथून एकाच लेनमध्ये वाहने चालतात. त्यातच भर म्हणून चौकामध्ये रिक्षा उभ्या केल्या जातात. रिक्षा उभ्या असल्यामुळे वाहनांना पुढे जाता येत नाही. परिणामी सिग्नलच्या मागील बाजूपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. सिग्नल सुरू झाल्याने विरुध्द बाजूने येणारे वाहनचालक भरधाव वाहने घेऊन येतात. त्यातून वादाचे प्रसंग उद्भवतात.
रस्त्यावरील वादाचा व सततच्या वाहतूककोंडीचा फटका रुग्णांना बसत आहे. तातडीने रुग्णालयात रुग्णांना दाखल करताना रुग्णवाहिकेच्या चालकांची दमछाक होते. रस्ता अरुंद असल्यामुळे रुग्णवाहिकेला रस्ता उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक स्कुलबस या कोंडीमध्ये अडकलेल्या पाहायला मिळतात. उशीर झाल्यास काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संबंधित दिवशी प्रवेद दिला जात नाही. त्यामुळे उशीर झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना घरी परतावे लागते. अनेक कामगारांना कार्यालय व कामाच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर होतो. त्यामुळे बहुतांश कामगारांना ‘लेट मार्क’चा शेरा पडतो.