वाहतूक विस्कळीत
By admin | Published: September 30, 2016 04:50 AM2016-09-30T04:50:39+5:302016-09-30T04:50:39+5:30
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास खंडाळा बोरघाटात एका टेम्पोेने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडील मार्गिकेवरील वाहतूक तब्बल
लोणावळा : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास खंडाळा बोरघाटात एका टेम्पोेने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडील मार्गिकेवरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती.
खोपोली महामार्ग पोलीस व आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सकाळी मुंबईकडून पुण्याच्या दिशेने सौंदर्य प्रसाधने, कपडे, स्टेशनरी आदी घेऊन येणाऱ्या टेम्पोला (एचआर ६१ बी १२४३) बोरघाटातील चढणीवर शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. त्यात टेम्पो साहित्यासह खाक झाला. यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक जवळपास चार तास ठप्प झाली होती. आयआरबी कंपनीचे तीन व खोपोली नगर परिषदेच्या एका अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आल्यानंतर साडेनऊच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी सकाळचे साडेअकरा वाजले होते.
अनेकदा द्रुतगती मार्गावर गाडीला अचानक आग लागणे, कंटेनर बंद पडणे यासारख्या घटना वारंवार घडतात. परंतु तातडीने ही वाहने हलविली जात नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)
आयआरबी : व्यावसायिकांचे सूचनांकडे दुर्लक्ष
मागील काही दिवसांत विविध साहित्य घेऊन जाणाऱ्या अनेक वाहनांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ट्रान्स्पोर्टच्या वाहनांमध्ये स्टेशनरी, परफ्युम, कपडे आदी साहित्यांची सर्रास वाहतूक केली जाते. अनेक वेळा परफ्युमच्या गॅसचा स्फोट होत असल्याने अशा वस्तंूची महामार्गावरून वाहतूक करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना करूनदेखील संबंधित व्यावसायिक सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आयआरबीचे अधिकारी व महामार्ग पोलिसांनी सांगितले.