बेशिस्तीमुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:46 AM2018-06-24T02:46:03+5:302018-06-24T02:46:06+5:30

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी दरम्यान सर्रासपणे अवैध रिक्षा वाहतूक सुरू आहे. या रस्त्यादरम्यान येणाऱ्या प्रत्येक चौकात रिक्षाचालक बेशिस्तपणे उभे असतात.

Traffic drivers due to the sham | बेशिस्तीमुळे वाहतूककोंडी

बेशिस्तीमुळे वाहतूककोंडी

Next

रहाटणी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी दरम्यान सर्रासपणे अवैध रिक्षा वाहतूक सुरू आहे. या रस्त्यादरम्यान येणाऱ्या प्रत्येक चौकात रिक्षाचालक बेशिस्तपणे उभे असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले; मात्र बेशिस्त रिक्षाचालकांमुळे अनेक चौकांना बकालपणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक चौक म्हणजे पिंपरी-चिंचवड शहराचा मुख्य चौक समजाला जातो. मात्र याच चौकात सर्वांत जास्त रिक्षा बेशिस्तपणे उभ्या असल्याचे दिसून येते. या चौकातून मोरवाडी आणि चिंचवड स्टेशनकडे जाणाºया रस्त्यावर रिक्षा बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. या चौकातील सिग्नलजवळच या रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे सिग्नल सुटल्यानंतर अन्य वाहनांचा या रिक्षांचा अडथळा होतो. बीआरटीएस मार्गिकेमुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. असे असतानाही चौकात भर रस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जातात. रस्त्याच्या दुसºया बाजूला पदपथाजवळ पथारीवाले, हातगाडीधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्या पुढच्या बाजूला रिक्षाचालक थांबतात. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. सिग्नल सुटल्यानंतर चौकातच रस्त्याच्या बाजूला नव्हे, तर रस्त्याच्या मधोमध रिक्षाचालक उभे असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. मात्र याकडे वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येते.

वाहतूक पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकता
रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थित आहे किंवा नाही, कोणी वाहतुकीचे नियम मोडत नाही ना, चौकात वाहतूककोंडी होणार नाही याच्यावर लक्ष ठेवणे यासह अनेक जबाबदाºया वाहतूक पोलिसांवर असतात. असे असतानाही पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मोरवाडी चौकात पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसून येतात. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. बेशिस्त रिक्षाचालकांना पाठीशी का घातले जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

अन्य वाहनचालकांना दंड
चौकातील सिग्नलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून चारचाकी, दुचाकी आणि अन्य वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. ही कारवाई योग्य असली, तरी बेशिस्त रिक्षाचालकांना मात्र यातून सूट देण्यात येत असल्याचे दिसून येते. वाहतूककोंडी झाल्यास केवळ शिटी वाजवून रिक्षाचालकांना सूचित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत नाही किंवा कोणती कारवाईही होत नाही. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न अन्य वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मोरवाडी चौकातही रिक्षावाल्यांचा बेशिस्तपणा दिसून येतो. या चौकात रस्त्याच्या दुतर्फा हीच परिस्थिती आहे. प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवण्यासाठी रिक्षाचालक नियम धाब्यावर टांगताना दिसत आहेत. एखाद्या प्रवाशाने हात दाखवल्यावर मागे-पुढे न पाहता रिक्षाचालक त्वरित रिक्षा बाजूला घेतो. यामुळे त्याच्या मागे असणाºया दुचाकीस्वारांना व इतर वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे छोटे-मोठे अपघात रोजच घडत आहेत. डाव्या बाजूला वळण घेताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. महापालिकेने शहरात प्रशस्त रस्ते उभारले आहेत. मात्र असे असतानाही रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतुकीच्या समस्या कायम आहेत.

Web Title: Traffic drivers due to the sham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.