वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 03:59 PM2019-07-07T15:59:34+5:302019-07-07T17:08:21+5:30

वर्षाविहारासाठी पर्यटकांनी लाेणावळ्यात गर्दी केल्याने वाहनांच्या आठ ते दहा किलाेमीटर रांगा लागल्या आहेत.

traffic jam in lonavala | वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा

वर्षाविहारासाठी पर्यटक लाेणावळ्यात ; महामार्गावर वाहनांच्या रांगा

googlenewsNext

लोणावळा : वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरता आज लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत तर भूशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याकरीता आज सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्याने दुपारी बारा वाजता भुशी धरण ते कुमार चौक अशी सुमारे सात किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावर तर सकाळपासूनच वाहनांची गर्दी झाल्याने खंडाळा ते लोणावळा व लोणावळा ते वलवण दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुशी धरण व लायन्स पॉइंट या पर्यटन स्थळांवर आज अक्षरशः पाय ठेवण्यास देखील जागा शिल्लक राहिली नव्हती. वाहनांमधून येणाऱ्या पर्यटकांप्रमाणेच रेल्वेगाड्यांना येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी असल्याने भुशी धरण ते लोणावळा रेल्वे स्थानकादरम्यान पायी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. 

पर्यटनस्थळांवर व राष्ट्रीय महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सोडवण्याकरता लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आ. पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक बजरंग सांगडे, राधिका मुंडे, मृगदीप गायकवाड यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी, वॉर्डन, पोलिस मित्र व मुख्यालयाकडून आलेले पोलिस कर्मचारी असा सुमारे सव्वाशे पोलिसांचा ताफा रस्त्यावर तैनात होता. लोणावळा शहरात आज प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याने सर्वत्र वाहने व वाहतुक कोंडी असेच चित्र पहायला मिळत होते. स्थानिक नागरिकांना आज अक्षरशः घरातून बाहेर पडणे अवघड झाले होते. लोणावळा खंडाळा परिसरातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, गिधाड तलाव, राजमाची गार्डन, डय़ुक्स नोज सनसेट पाँईट, यासह कार्ला लेणी,  भाजे लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: traffic jam in lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.