वर्दळीच्या रस्त्यावर 'तस्कर'मुळे वाहतूक कोंडी; होमगार्डमुळे जखमी सापाला जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 02:59 PM2020-10-14T14:59:54+5:302020-10-14T15:01:09+5:30
ताथवडे येथे बुधवारी सकाळी रावेत- सांगवी बीआरटीएस मार्गावर पाच फुटांचा साप आल्याचे काहींच्या निदर्शनास आले....
पिंपरी : जखमी अवस्थेतील पाच फुटांचा तस्कर जातीचा साप वर्दळीच्या रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली. बघ्यांनी गर्दी केली. त्याचवेळी तेथून जात असलेल्या गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानाने रस्त्यावर पडलेल्या पोत्यात सापाला पकडले. त्यानंतर त्याला सर्पमित्राच्या स्वाधीन केले.
ताथवडे येथे बुधवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास रावेत- सांगवी बीआरटीएस मार्गावर पाच फुटांचा साप आल्याचे काही वाहनचालकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वाहने थांबल्याने गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली. नागरिकांचा एकच गलका सुरू झाला. मारा, पकडा, लांब व्हा, बाजूला जा... असा आरडाओरडा केला. दरम्यान, साप जागेवर काही फूट उभा राहून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र ते शक्य होत नव्हते. शेपटाजवळ त्याला जखम झाली असल्याचे दिसून आले. त्यामुळे गर्दीचा सूर बदलला. अरे तो जखमी आहे, त्याला उपचाराची गरज आहे. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा, कोणीतरी त्याला उचलून बाजूला करा, असे आवाहन करण्यात येत होते.
वाकड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले होमगार्ड संजय ताटे रावेत येथून डांगे चौकाकडे जात होते. त्यावेळी ताथवडे येथे रस्त्यावर गर्दी पाहून ते थांबले. सापामुळे कोंडी होत असून नेमका प्रकार त्यांनी समजून घेतला. बीआरटीएस मार्गावर पडलेले रिकामे पोते सापाजवळ ठेवले. त्यांच्याकडील काठीच्या साह्याने सापाला पोत्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर सापाला पोत्यात घालून पकडण्यात यश आले. सापांच्या विषारी व बिनविषारी तसेच इतर बाबतीत माहिती नसताना देखील ताटे यांनी मोठ्या धाडसाने सापाला पकडले. त्यामुळे त्यांचे कौतुक झाले.
ताटे यांनी त्या सापाला सर्पमित्र गणेश बुटकर यांच्या स्वाधीन केले. त्याला उपचाराची गरज असल्याने कात्रज येथील वन्य पशूपक्षी अनाथालयात सापाला दाखल केले. उपचारानंतर सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तस्कर जातीचा साप बिनविषारी असतो. हा साप महाराष्ट्रात सर्रास आढळतो. छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, आडगळीच्या जागा येथे तस्कर जातीचा साप वावरत असतो, असे सर्पमित्र गणेश बुटकर यांनी सांगितले.