वाहतूक पोलिसांना मिळाले ई-चलन मशीन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 01:09 AM2019-02-17T01:09:42+5:302019-02-17T01:10:15+5:30
एक राज्य, एक ई चलन उपक्रम : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत १८० मशीन वितरित
पिंपरी : ‘वन स्टेट, वन ई-चलन’ अर्थात एक राज्य, एक ई-चलन अशा स्वरूपातील या उपक्रमाला पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. राज्यात कोणत्याही भागात वाहनचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले असेल, तर त्याची दंड रक्कम शिल्लक असल्याची नोंद या चलन मशीनवर आढळून येणार आहे. वाहनचालक कोणत्याही भागात राहण्यास असला तरी त्याच्याकडून राज्यात कोणत्याही ठिकाणी दंड वसुली करणे शक्य होणार आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गतच्या वाहतूक पोलिसांना १८० ई-चलन मशीन वितरित करण्यात आल्या.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव यांनी पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ही माहिती दिली. या वेळी पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, प्रभाकर शिंदे, हिंजवडी वाहतूक पोलीस शाखेचे किशोर म्हसवडे, यशवंत गवारी, अशोक गवारे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांच्या पालकांकडून ई -चलनाद्वारे दंड वसूल कारण्यात आला. या वेळी या उपस्थितांना कारवाईचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव म्हणाल्या की, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे यापूर्वी थ्रीजीच्या केवळ ९९ मशीन होत्या. आता १८० मशीन वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या नवीन मशीन फोरजी (अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील) असून, यामध्ये संबंधित वाहनचालकाला जागेवरच दंडाची पावती मिळणार आहे. दंड भरल्यासंबंधीचा मेसेज लगेच त्याच्या मोबाइलवर जाणार आहे. त्यामुळे ही पद्धत पारदर्शक आहे. तसेच एखाद्या व्यक्तीकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास त्याला रोख दंड भरावा लागणार आहे. मशीनमध्ये मोटारीचा, वाहनाचा क्रमांक टाईप करताच, या वाहनासंबंधीची माहिती तत्काळ मशीनवर उपलब्ध होणार आहे.