चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असूनही ट्राफिक, प्रदूषण, अपुरे पाणी या समस्या कायम - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 03:00 PM2024-11-12T15:00:47+5:302024-11-12T15:01:41+5:30
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच चिचंवडकरांना मूलभूत सुविधा देण्याला प्राधान्य असेल
पिंपरी : गेली दहा वर्षे गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता होती. तरीही, चिंचवड मतदारसंघात नागरी समस्या कायम आहेत. वाहतूक कोंडी, वायुप्रदूषण, अपुरे पाणी, विजेचा लपंडाव असे प्रश्न कायम आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच आयटीयन्स करदात्यांना मूलभूत सुविधा देण्याला प्राधान्य असेल, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी वाकड येथे दिले.
महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयटीयन्स आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुळे व मान्यवरांच्या हस्ते राहुल कलाटे यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
सुळे म्हणाल्या की, समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस निर्णय घेतले नाहीत, त्यामुळे मतदारसंघात वीज, पाणी, सुरक्षित रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा यांसारख्या समस्या कायम आहेत. यापलीकडे जाऊन प्रशस्त उद्याने, मनोरंजन केंद्र, पर्यावरण यासाठीही ठोस कामे झाली नाहीत. पुनावळे, रावेत, वाकडमध्ये महामार्गालगत असलेल्या सेवारस्त्याचे रुंदीकरण का रखडले आहे?
आयटीयन्सनी मांडले समस्यांचे गाऱ्हाणे
हिंजवडीतील नऊ तासांच्या नोकरीसाठी पाच तासांहून अधिक वेळ वाहतूक कोंडीमध्ये जातो, वर्दळ असलेल्या वाकड, पिंपळे सौदागरला मेट्रो कनेक्टिव्हीटी का नाही? हिंजडीतील मेट्रो बालेवाडीकडे न वळवता हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा असा मार्ग का नाही? आयटीयन्स नाइलाजाने मोटारीने प्रवास करतात. मात्र, कोंडीमुळे इंधनाच्या अपव्ययाबरोबर वेळ, पैसा जातो. प्रदूषणात भर पडते. आयटीतील खड्ड्यांची मालिका, वीज लपंडाव, जनरेटरवर डिझेलसाठी लाखोंचा खर्च, टँकरद्वारे तहान भागविण्यासाठी खर्च आदी समस्यांचे गाऱ्हाणे त्यांनी मांडले.