चिंचवड परिसरात वाहतूक समस्या गंभीर
By admin | Published: November 28, 2015 12:37 AM2015-11-28T00:37:14+5:302015-11-28T00:37:14+5:30
वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी चिंचवड परिसरातील विविध भागांत नो-पार्किंग झोन व सम-विषम पार्किंगची व्यवस्था करण्यात आली
चिंचवड : वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी चिंचवड परिसरातील विविध भागांत नो-पार्किंग झोन व सम-विषम पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. मात्र या भागात वाहतूक शाखेचे नियोजन नसल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
चापेकर चौकातील वाहतूक समस्या विचारात घेऊन या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी केली. थेरगावकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना याचा फायदा होत आहे. मात्र चौकातील वाहतूककोंडी अजूनही सुटलेली नाही.परिसरात व पुलाखाली नो पार्किंग झोनचे फलक लावले आहेत. मात्र तरीही या भागात वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केले जाते. परिसरात नामांकित बँका, व्यावसायिकांची दुकाने,भाजी मार्केट व शाळा असल्याने या भागात नेहमी वर्दळ असते. मात्र वाहतूक नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कुचकामी असल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे.
चापेकर चौकातून चिंचवड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर सम-विषम पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र याचे पालन होत नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जातात. या भागातील वाहतूक समस्या गंभीर झाल्याने येथे सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या भागात वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रया व्यक्त करीत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात असल्याने पादचाऱ्यांना येथील वाहतुकीचा सामाना करावा लागतो. अहिंसा चौकात खाद्यपदार्थांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या असतात.(वार्ताहर)