वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 02:53 AM2018-10-29T02:53:53+5:302018-10-29T02:54:20+5:30
मध्यवर्ती शहरात बेशिस्त; वाहतूककोंडीची ‘डोकेदुखी’, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष, कारवाईकडे काणाडोळा
पिंपरी : महापालिकेचे रस्त्यावरील अनियमित फलक, दुतर्फा पार्किंग, अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या सर्व समस्यामुळे वाहतुकीच्या नियमांचा खेळखंडोबा झाला आहे. शहरात येणारा सर्व पेठांचा भाग, मुख्य रस्ता, मध्यवर्ती भागात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
पिंपरी कॅम्प आणि पिंपरी उड्डाणपुलावरच्या रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. तर त्या भागातील बंद सिग्नल, खड्डे, फलके, पार्किंग अशा अनेक समस्या ‘लोकमत’ पाहणीतून दिसून आल्या आहेत.
शहरातील अनेक वाहतुकीच्या समस्या दिसून येतात. मोरवाडी येथे नो-पार्किंग फलकांसमोर दुचाकी पार्किंग केली जाते. या चौकात नो-पार्किगचे फलक लावूनही दररोज दुतर्फा पार्किंग केले जाते. या फलकांसमोर दुचाकी वाहनांची पार्किंग असूनही त्याठिकाणी चार चाकी वाहने लावली जातात. पिंपरी कँम्पातील रस्त्यावर मोठे ट्रक माल उतरवण्यासाठी थांबतात. जवळपास एक-दीड तास ही वाहने तिथून हलत नाहीत. या रस्त्यावरून येणारी बस व इतर मोठ्या वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण होतो.
तसेच रस्त्यावर चारचाकी वाहने पार्क केली जातात. वाहनचालकांना गोष्टीचा खूप त्रास होतो. रस्ता ओलांडण्यास नागरिकांना सिग्नलची मदत होत असते. परंतु सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, व महिलांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. नियमांचे उल्लघंन करणाºया वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
अरुंद रस्त्यामुळे अडचण
मेट्रोच्या कामामुळे मोरवाडी चौक ते पिंपरी चौक हा रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी दुतर्फा पार्किंग केली जाते. पोलीस नेहमी येऊन कारवाई करतात, वाहनांना जॅमर लावतात. पण काही उपयोग होत नाही. दिवसेंदिवस ही वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे.पिंपरीहून निगडीकडे जाणाºया रस्त्यावर रिक्षाचालक रस्त्यात रिक्षा उभ्या करतात. बºयाच वेळा वाहतूक पोलीस या रिक्षात बसून असतात. त्यामुळे रिक्षाचालकांवर कारवाई कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
नो र्पाकिंगमध्ये केले जाते पार्किंग
निगडी प्राधिकरणातील पवळे चौकात खाद्यपदार्थच्या खूपच गाड्या दिसून येतात. येथे पीएमपीचा बसथांबा आहे. त्या ठिकाणी या गाड्या उभारण्यात आल्या आहेत. या चौकात चारही बाजूने वाहने वेगाने येतात. त्यामुळे विस्कळीत वाहन व्यवस्था दिसून येते. गुरुवारी येथील वाहतूक नियंत्रक दिवे बंद असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. येथील कोहिनूर आर्केडजवळ नो पार्किंगमध्ये वाहने उभी केली जातात. या ठिकाणी पोलिसांची कारवाई होते. पण नावापुरतीच असल्याने पुन्हा परिस्थिती जैसे-थे आहे.
टिळक चौकात सिग्नलची गरज
टिळक चौक ते भेळ चौक या रस्त्यावर पी १, पी २ अशी फलके लावूनही दुतर्फा पार्किंग केले जाते. तसेच या रस्त्यावर असणाºया हॉटेलसमोर चारचाकी वाहने पार्क केली जातात.
त्यामुळे येथे वाहतूककोंडी निर्माण होते. तसेच मोती चौकात पाणीपुरी, वडापाव, डोसा, इडली चटणी अशा खाद्यपदार्थ गाड्या आहेत.
यामुळे नागरिक या ठिकाणी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत असतात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मोती चौक हा मुख्य रस्त्यावर आहे. या चौकात सिग्नलची गरज असूनही सिग्नल नाही.