आठवडे बाजारामुळे वाहतूककोंडी
By admin | Published: May 15, 2017 06:38 AM2017-05-15T06:38:09+5:302017-05-15T06:38:09+5:30
येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा
लोकमत न्यूज नेटवर्क
थेरगाव : येथील डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे दर रविवारी अक्षरश: वाहतूककोंडीचा उच्चांक पहावयास मिळतो. दर रविवारी भरणाऱ्या बाजारामुळे होणाऱ्या कोंडीला वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहे.
डांगे चौक हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहनांची वर्दळ असते. औंध-रावेत आणि चिंचवड-हिंजवडी असा हा रोड मुंबई हायवे आणि हिंजवडी आयटी पार्कला जात असल्यामुळे या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीला सर्वच प्रवासी वैतागले आहेत. हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’च आहे.
काही दिवसांपूर्वी अतिक्रमण कारवाईच्या विरोधात व्यावसायिकांनी रास्ता रोको केले, तर अधिकाऱ्यांनीपुढच्या रविवारपासून येथे बसू नका, अशा सूचना केल्या. त्यानंतर काही आठवडे बाजार नसल्याने वाहतूक सुरळीत होती. मात्र पुन्हा आठवडे बाजार राजरोसपणे रस्त्यावरच भरत आहे. डांगे चौकातील चारही रस्त्यांना जणू अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.
मंडईचे पुनर्वसन लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले जाते; पण त्या दृष्टीने कोणीही ठोस असे पाऊल उचलताना दिसत नसल्याचे दृश्य दिसते आहे. या ठिकाणी आठवडे बाजाराला फक्त स्थानिक नागरिक येत नसून, आसपासच्या गावागावातून ट्रक, टेम्पो भरून नागरिक बाजार करण्यासाठी येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दीचे प्रमाण वाढते.
व्यावसायिकांना योग्य प्रकारे मंडई उपलब्ध नसल्यामुळे पोट भरण्यासाठी रस्त्यावरच भाजीपाला विकावा लागतो व आपला उदरनिर्वाह करावा लागतो. जर लवकरात लवकर मंडईचे पुनर्वसन झाले, तर हा कोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यामुळे मंडईचे पुनर्वसन होणार कधी, असा संतप्त सवाल नागरिक करत
आहेत.