पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 09:58 PM2021-07-29T21:58:58+5:302021-07-29T22:00:45+5:30
पोलीस दलातील बदली प्रक्रियेत मोठा घोळ होत असल्याचे आरोप केले जातात...
पिंपरी : शहर पोलीस दलात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बदल्या करण्यात आल्या. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पसंती क्रम जाणून घेत पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत या बदल्या केल्या.
पोलीस कर्मचाऱ्यांना एक लिंक पाठवून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्याशी संवाद साधत या बदल्या करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी पसंतीच्या पोलीस ठाण्याचे नाव सुचवल्यानंतर उपलब्धतता तपासून आयुक्तांनी लगेचच बदलीचे आदेश दिले. यावेळी बदलीबाबत झटपट निर्णय झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधान पहावयास मिळाले. बुधवारी तसेच गुरुवारीही या पद्धतीने बदलीची प्रक्रिया राबविण्यात आली.
पोलीस दलातील बदली प्रक्रियेत मोठा घोळ होत असल्याचे आरोप केले जातात. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे आणि उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांनी थेट कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांच्या अडचणी व पसंती क्रम जाणून घेण्याचा निर्णय घेतला.
अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
पोलीस ठाण्याचा कार्यकाल पूर्ण झालेल्या सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ (दिघी ते हिंजवडी), उद्धव खाडे (हिंजवडी ते शिरगाव), शाहिद पठाण (देहूरोड ते वाहतूक विभाग), उपनिरीक्षक विद्या माने (दिघी ते आळंदी), विशाल दांडगे (चाकण ते भोसरी), दत्तात्रय मोरे (देहूरोड ते पिंपरी), अमरदीप पुजारी (एमआयडीसी भोसरी ते चिखली), बापू जोंधळे (आळंदी ते दिघी), विनोद शेंडकर (सांगवी ते चाकण), सचिन देशमुख (चिखली ते एमआयडीसी भोसरी), नंदराज गभाले (हिंजवडी ते दिघी) यांची बदली झाली आहे