पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ११६ सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या
By नारायण बडगुजर | Published: January 15, 2024 06:58 PM2024-01-15T18:58:09+5:302024-01-15T18:59:06+5:30
जिल्ह्यात मूळ वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर राहता येणार नाही, अशा प्रकारचे निवडणूक विभागाचे आदेश
पिंपरी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पोलिस घटकांमध्ये अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू आहे. त्यानुसार पिंपरी -चिंचवड शहर पोलिस दलात देखील अंतर्गत बदल्या करण्यात येत आहेत. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील ११६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. त्यानंतर २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. पाच वर्षांनंतर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यंदा होणार आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांर्गत बदल्या करण्यात येत आहेत. शनिवारी (दि. १३) शहर पोलिस दलातील १२ सहाय्यक निरीक्षक आणि ४५ पोलिस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. त्यानंतर रविवारी (दि. १४) आणखी १८ सहायक पोलिस निरीक्षक आणि ४१ पोलिस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या.
जिल्ह्यात मूळ वास्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर राहता येणार नाही, अशा प्रकारचे निवडणूक विभागाचे आदेश आहेत. त्यामुळे कार्यकारी पदावर कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार जर बदल्या करायच्या झाल्यास आयुक्तालयातील सर्वच पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना बदलावे लागेल. त्यामुळे पोलिस महासंचालक कार्यालयातील संबंधित अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी याबाबत मागील आठवड्यात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये काही बदल सुचवले होते. त्यानुसार पोलिस ठाणे हे कार्यकारी पद गृहित धरून, अन्य सर्व शाखा या अकार्यकारी समजण्यात याव्यात, असे सांगण्यात आले. त्यानुसार, शनिवारी पहिल्या टप्प्यात उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर ११६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या.