रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक; ९६ किलो गांजा पकडला

By नारायण बडगुजर | Published: January 17, 2024 07:12 PM2024-01-17T19:12:09+5:302024-01-17T19:12:46+5:30

अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला एक कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल

Transportation of marijuana by ambulance 96 kg of ganja seized | रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक; ९६ किलो गांजा पकडला

रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक; ९६ किलो गांजा पकडला

पिंपरी : रुग्णवाहिकेतून गांजाची विक्रीसाठी वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश करत गांजा विक्री प्रकरणी मोठी कारवाई केली. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पथकाने ९६ किलो गांजासह एक कोटी ३१ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  

अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस अंमलदार सदानंद रुद्राक्षे आणि रणधीर माने यांना १२ जानेवारी रोजी गांजा विक्री प्रकरणी माहिती मिळाली. त्यानुसार रावेत येथील म्हस्के वस्तीत बीआरटी रस्त्यावरून कृष्णा मारुती शिंदे (२७, रा. शिंदेवस्ती, ता. कर्जत, अहमदनगर), अक्षय बारकू मोरे (२९, रा. पाटेगाव, ता. कर्जत, अहमदनगर), हनुमंत भाऊसाहेब कदम (३५, रा. कुसडगाव, ता. जामखेड, अहमदनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिघांकडून २५ लाख ६९ हजार १०० रुपये किमतीचा २५ किलो ६९१ ग्रॅम गांजा, एक कार, मोबाईल आणि रोकड असा ३० लाख ५५ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला. 

तिघांनी हा गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे (३२, रा. उंडेगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) याच्याकडून आणला असून तो गांजा सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) याला विकणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी देवी प्रसाद याला उंडेगाव येथून ताब्यात घेतले. संशयित हे रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक करत होते. त्या दोन रुग्णवाहिका पोलिसांनी ताब्यात घेतल्या. देवी प्रसाद याच्याकडून ५० लाख २० हजार रुपयांचा ५० किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला.  

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडिक, पोलिस अंमलदार बाळासाहेब सूर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, मनोज राठोड, संतोष भालेराव, अनिता यादव, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अजित कुटे, प्रसाद जंगीलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे, पांडुरंग फुंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

उत्तर प्रदेशातून तस्करी

अमली पदार्थ विरोधी पथकाने दुसरी कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली. पोलिस अंमलदार विजय दौंडकर आणि प्रसाद कलाटे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सन्नीदेवल सिद्धनाथ शर्मा (२१), सन्नीदेवल भगवानदास भारती (२३, दोघे रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना कुरुळी येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० लाख ७९ हजार ६०० रुपये किमतीचा २० किलो १९६ ग्रॅम गांजा आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. संशयितांनी हा गांजा उत्तर प्रदेश येथून राजेश कुमार (रा. घोरावल, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश) याच्याकडून आणला असल्याचे तपासात समोर आले.

एक कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच दिवसात दोन मोठ्या कारवाया केल्या. यात ९६ किलो ८७ ग्रॅम गांजा, एक कार, दोन रुग्णवाहिका, मोबाईल फोन, रोकड असा एक कोटी ३१ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गांजा विक्री करणारे आणि खरेदी करणारे अशा सर्व संशयिताना अटक केली.

Web Title: Transportation of marijuana by ambulance 96 kg of ganja seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.