कचरावेचकांसाठी पत्राशेड तरी असावे
By admin | Published: December 23, 2016 12:47 AM2016-12-23T00:47:21+5:302016-12-23T00:47:21+5:30
ऊन, वारा, थंडी आणि पाऊस याची पर्वा न करता शहरभरातील कचरा वेचणाऱ्या कामगारांना सुविधा देण्याचा विचार होत नाही.
पिंपरी : ऊन, वारा, थंडी आणि पाऊस याची पर्वा न करता शहरभरातील कचरा वेचणाऱ्या कामगारांना सुविधा देण्याचा विचार होत नाही. शहरभरातून जमा केलेल्या कचऱ्याच्या ढिगात बसूनच ते जेवण करतात. जेवणासाठी, घटकाभर विश्रांतीकरिता पत्र्याचे शेड असावे, एवढी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. घनकचरा व्यवस्थापनावर विचार केला जातो. परंतु त्यावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगारांचा विचार मात्र कोणत्याही पातळीवर केला जात नाही.
पिंपरी : घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या कचरावेचकांना किमान वेतनही मिळत नाही. ठेकेदारांकडून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. कचरा वेचण्याचे काम करताना त्यांना सुरक्षासाधने पुरवली जात नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या कचरावेचकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
शहराच्या विविध भागात गल्लोगल्ली घंटागाडी घेऊन जायचे. नागरिकांकडून कचरा जमा करायचा. जमा झालेला कचरा सांगवीतील नदीकाठी एका बाजूला मोकळ्या जागेत घेऊन ओला कचरा, सुका कचरा असे वर्गीकरण करायचे. असे दैनंदिन कामाचे स्वरूप आहे.
सकाळी सातला कचरा वेचण्याचे काम सुरू केल्यानंतर जमा कचऱ्याचे विलगीकरण करेपर्यंत दुपारचे दोन वाजतात. कचरावेचकांना ३३२ रुपये रोजंदारी मिळते. गैरहजर राहिल्यास ठेकेदार १०० रुपये प्रतिदिन दंड करतात. महापालिका आम्हाला दंड करते, म्हणून आम्ही दंड वसूल करतो, असे ठेकेदार सांगतात.
शहर स्वच्छ राखण्याचे मोलाचे काम करणाऱ्या, असंघटित कचरावेचकांच्या वाट्याला येणारी पिळवणूक थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सन्मानाची वागणूक द्या
सकाळी उठल्यापासून ते सायंकाळपर्यंत कचऱ्यात काम करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. कचरावेचक कचरा जमा करण्याचे काम करतात. म्हणून शहरात सर्वत्र साफसफाई होते, स्वच्छ वातावरण दिसून येते. कचऱ्याच्या ढिगात काम करतात. कायम घाणीत काम करणारे म्हणून त्यांच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहिले जाते. त्यांच्याशी वागण्या-बोलण्याची पद्धतही वेगळी दिसून येते. कचरा वाहतुकीच्या वाहनावरील चालकाशीही उद्धट वागणूक असते. हे सर्व कटू अनुभव येतात.कचरावेचकांना सन्मानाची वागणूक मिळावी. - सोनाली कुंजीर
...पगार नाही मान्य; पण दंड कशासाठी ?
कचरावेचक कामावर अनुपस्थित राहिल्यास त्यांना त्या दिवसाचे वेतन तर दिले जात नाहीच. उलट गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना प्रतिदिन १०० रूपये दंड आकारला जातो. हा दंड त्यांनी जेवढे दिवस काम केले. त्या दिवसांच्या पगारातून वसूल केला जातो. कामावर गैरहजर राहणे हा एक प्रकारचा गुन्हाच ठरू लागला आहे. वैयक्तिक कामानिमित्त आठ ते १० दिवस गैरहजर राहिल्यास महिन्याकाठी उर्वरित दिवसांच्या कामाच्या रोजंदारीतून दंडाची रक्कम कपात केल्यास हातात अगदी तुटपुंजी रक्कम पडते. - विजया पवार
पीएफकपातीची रक्कम ठेकेदाराच्या हिताची
कचरावेचक कामगारांची दरमहा पगारातील विशिष्ट रक्कम (पीएफ) भविष्यनिर्वाह निधीसाठी कपात केली जाते. प्रत्यक्षात मात्र ही कपात केलेली रक्कम कचरावेचकांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यात भरली जात नाही. ती ठेकेदाराकडेच असते. पगारातून कपात केलेली रक्कम जाते कोठे, असा प्रश्न कचरावेचकांपुढे उपस्थित झाला आहे. - बेगम शेख