ट्रामा सेंटर सुरू करण्याच्या हालचाली, खासगी रुग्णालयाला दिले भाडेतत्त्वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:45 AM2018-09-29T01:45:21+5:302018-09-29T01:45:33+5:30
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांमधील जखमींना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी शासनाने ७० लाख रुपये खर्च करून ओझर्डे गावच्या हद्दीत नऊ एकर जागेवर ट्रामा सेंटर व हेलीपॅडची उभारणी केली.
वडगाव मावळ - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांमधील जखमींना तातडीचे उपचार मिळावेत यासाठी शासनाने ७० लाख रुपये खर्च करून ओझर्डे गावच्या हद्दीत नऊ एकर जागेवर ट्रामा सेंटर व हेलीपॅडची उभारणी केली. गेल्या चार वर्षांपासून ही इमातर धूळ खात आहे. याबाबत ‘लोकमत’ने १६ सप्टेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत रस्ते विकास महामंडळाने ट्रामा सेंटर सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.
मुंबई-पुणे हा ९३ किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग २००२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. हा मार्ग उपयुक्त आणि सोईचा असला तरी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांमुळे या मार्गावर अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हजारो प्रवाशांचे बळी गेले आहेत. खोपोली व कळंबोलीदरम्यान होणाºया अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी एमजीएम रुग्णालय कळंबोली तर किवळे ते खंडाळादरम्यानच्या अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालय असे दोनच पर्याय आहेत. परंतु ही दोन्ही रुग्णालयांत जखमींना नेण्यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. प्राथमिक उपचारविना अनेक वेळा जखमींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
शासनाला कधी जाग येणार
गेल्या चार वर्षांपासून ही इमारत धूळ खात आहे. इमारतीला गवताचा वेढा आहे. हेलीपॅड उखडले आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळत नसल्याने मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. सोळा
वर्षांत बळींची संख्या काही हजारांवर गेली आहे. अजून किती बळी
गेल्यावर शासनाला जाग येणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
महामार्गावर अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उभारलेल्या ट्रामा सेंटर प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने जखमींची गैरसोय होत आहे. हस्तांतराच्या वादात हा प्रकल्प सुरू होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
द्रुतगती महामार्गावर ट्रामा सेंटर सन २०२८ पर्यंत पवना हॉस्पिटलला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. त्यासाठी मंजुरीही दिली आहे. लवकरच हे ट्रामा सेंटर सुरू होईल. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळतील.
नम्रता रेड्डी, कार्यकारी अभियंता,
रस्ते विकास महामंडळ