पिंपरीतील 'वायसीएम' रुग्णालयात म्युकर मायकोसिसच्या ३१ रुग्णांवर उपचार सुरू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 09:00 PM2021-05-20T21:00:21+5:302021-05-20T21:00:41+5:30

म्युकर मायकोसिस हा कोरोना सारखा संसर्गजन्य आजार नाही. एका रुग्णामुळे तो दुसऱ्याला होत नाही...

Treatment on 31 patients Mucor Mycosis in YCM hospital at pimpri | पिंपरीतील 'वायसीएम' रुग्णालयात म्युकर मायकोसिसच्या ३१ रुग्णांवर उपचार सुरू  

पिंपरीतील 'वायसीएम' रुग्णालयात म्युकर मायकोसिसच्या ३१ रुग्णांवर उपचार सुरू  

Next

पिंपरी : वायसीएम रुग्णालयात आतापर्यँत म्युकरमायकोसिसचे ६४ दाखल होते. त्यापैकी दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत त्यातील ३१ रुग्ण हे रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोरोना झालेल्या काही रुग्णांना म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत आहे. मागील काही दिवसात शहरात अचानक या आजाराचे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस हा नवीन आजार आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडला. परंतु म्युकरमायकोसिस हा आजार कोरोना झालेल्या रुग्णांना आता होत असला. तरी कोरोना पूर्वी या आजाराचे शहरात वर्षभरात अवघे  चार ते पाच रुग्ण आढळून येत होते. वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी ही माहिती दिली. 

डॉ. वाबळे म्हणाले की, ज्या आजारामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशांना हा आजार होतो. कोरोनापूर्वी एचआयव्ही, टीबी, अनियंत्रित मधुमेह अशा रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून येत होती. 

अतिमात्रेची 'स्टिरॉइड्स' दीर्घकाळ घेणं, रोगप्रतिकारशक्ती कमी होण, मधुमेह नियंत्रणात न राहणं  या  कारणांमुळे 'म्युकर' बुरशीचा संसर्ग होऊन, 'म्युकरमायकोसिस' होतो. कॅन्सरग्रस्त, मूत्रपिंड किंवा इतर अवयवांचं प्रत्यारोपण झालेल्या; तसंच डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्यानं, 'म्युकर'चा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. कोरोना पूर्वी या आजाराच्या  रुग्णांचे प्रमाण हे खूपच कमी होते. 
कोरोना झाल्यावर रुग्णांवर उपचार करताना जी औषधे दिली जातात. त्यामुळे रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा रुग्णांना हा आजार होत आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने बुरशी डोके वर काढते. शरीरातील कमकुवत झालेल्या भागाला बुरशी लागते. बुरशी तोंड, नाकातून शरीरात प्रवेश करते. शरीराचा कमकुवत भाग म्हणजे चेहरा असतो. नाकाच्या बाजुची पोकळी, डोळा कमकुवत असतो.  त्याच्यातून बुरशी शरीरात जाते. उपचाराचे काही साईट इफेक्टसही होत असतात. मधुमेह असेल तर साखरेचे प्रमाण जास्त झालेले असते. अशा ठिकाणी बुरशी लगेच पसरते. 
---
संसर्गजन्य आजार नाही....
म्युकरमायकोसिस हा कोरोना सारखा संसर्गजन्य आजार नाही. एका रुग्णामुळे तो दुसऱ्याला होत नाही. सध्या कोरोना  झालेल्या,  मधुमेह आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना हा आजार होत आहे. डोळे आणि  डोक्यात तीव्र वेदना होणे, डोळे लाल होणे, दातांमध्ये दुखणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
----
रुग्णांसाठी कॉल सेंटर सुरू 
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची माहिती घेण्यासाठी महापालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे. दोन दिवसात २३६९ जणांची फोन करून माहिती घेण्यात आली आहे. कोरोनातून  बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत का याची  माहिती कॉल सेंटरच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

Web Title: Treatment on 31 patients Mucor Mycosis in YCM hospital at pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.