अवाजवी बिलांचा झटका, दिघीकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:54 AM2018-08-13T01:54:19+5:302018-08-13T01:54:29+5:30
परिसरातील नागरिक विजेच्या समस्यांनी ग्रासलेले असताना महावितरण कंपनीने आणखी एक नवी समस्या निर्माण करून दिघीकरांच्या समस्येत भर टाकली आहे.
दिघी - परिसरातील नागरिक विजेच्या समस्यांनी ग्रासलेले असताना महावितरण कंपनीने आणखी एक नवी समस्या निर्माण करून दिघीकरांच्या समस्येत भर टाकली आहे. महावितरणच्या कारभाराने आधीच त्रस्त असलेल्या वीज ग्राहकांना योग्य सुविधा मिळत नाहीत.
वीजपुरवठा खंडित होणे नित्याचेच झाले आहे. शिवाय तक्रार दाखल केल्यानंतरसुद्धा तत्काळ कारवाई केली जात नसल्याचे सह्याद्री कॉलनीमधील घटना ताजी असताना महावितरणने वीज ग्राहकांना मोठ्या रकमेची बिले आकारून झटका दिला आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांनी महावितरणच्या सावळ्या गोंधळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे निवृत्त झाल्याने या विभागाचा कारभार अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे यांच्याकडे आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, योग्य माहिती घेऊन नेमका प्रकार कशामुळे झाला आहे ते बैठकीमध्ये स्पष्ट होईल. बिलाच्या समस्येबाबत नागरिकांना सहकार्य करून समस्या सोडविल्या जातील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
दरम्यान दिघी आणि परिसरामध्ये वीजपुरवठ्याबाबत अनेक समस्या आहेत. याबाबत नागरिकांनी महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी केल्या. मात्र, अधिकाºयांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यात वाढीव आणि चुकीच्या बिलांमुळे नागरिकांच्या संतापात भर पडली.
दिघीतील वीज ग्राहकांना त्यांच्या चालू बिलामध्ये मागील भरलेले बिल जोडून आले आहे. तर काही नागरिकांच्या बिलावरील चालू रीडिंग व मागील रीडिंग सारखे दाखवले असून अंदाजे दोनशे युनिटचे बिल आकारण्यात आली आहेत.
काही बिलावरील मीटर रीडिंगचे फोटो गायब झाले आहेत तर काही फोटो अस्पष्ट दिसून येत आहेत. या सर्व गोंधळामुळे नागरिक मोठ्या पेचात सापडले आहेत.
महावितरणच्या कार्यालयात माहिती घेतली असता सॉफ्टवेअरची समस्या झाल्याचे सांगत जबाबदारी झटकण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भरलेली बिले वाढवून परत आल्याने ती कमी होतीलही; परंतु त्या कामाकरिता भोसरी गाठून वेळ द्यावा लागणार. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ महावितरणने आणली आहे.