सिद्धांतला दुहेरी मुकुट, वैदेही चौधरीला मुलींच्या गटाचे विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 02:26 AM2017-12-10T02:26:48+5:302017-12-10T02:27:17+5:30
भारताच्या सिद्धांत बांठियाने मुलांच्या एकेरीत अभिमन्यू वैण्णमरेड्डीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून गद्रे करंडक आयटीएफ कुमार टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले. दुहेरी मुकुट संपादन केला. शुक्रवारी सिद्धांतने दुहेरीचे जेतेपद आपल्या नावावर केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारताच्या सिद्धांत बांठियाने मुलांच्या एकेरीत अभिमन्यू वैण्णमरेड्डीचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून गद्रे करंडक आयटीएफ कुमार टेनिस स्पर्धेत विजेतेपद जिंकले. दुहेरी मुकुट संपादन केला. शुक्रवारी सिद्धांतने दुहेरीचे जेतेपद आपल्या नावावर केले होते. मुलींच्या गटात भारताच्या वैदेही चौधरीने आकांक्षा मानेला नमवित विजेतेपद जिंकले.
डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने त्यांच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याचा असलेल्या सिद्धांत बांठिया याने सातव्या मानांकित अभिमन्यू वैण्णमरेड्डी याचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून एकेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. सिद्धांतचे २०१७ या वर्षातील हे पहिलेवहिले विजेतेपद ठरले.
सिद्धांतने बेसलाइनवरून अभिमन्यूपेक्षा सरस खेळ केला. सिद्धांतच्या कोर्टच्या तिरकस फटक्यांना अभिमन्यूकडे उत्तर नव्हते. १७ वर्षीय सिद्धांत याने पहिल्या सेटमध्ये अभिमन्यूची २, ८ आणि १० व्या गेममध्ये सर्व्हिस बे्रक केली, तर अभिमन्यूने ७ आणि ९ व्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस बे्रक केली. हा सेट ६-४ असा जिंकून सिद्धांतने आघाडी घेतली. दुसºया सेटमध्ये सिद्धांतने अधिक वर्चस्व राखून खेळ केला. या सेटमध्ये सिद्धांतने चौथ्या गेममध्ये अभिमन्यू सर्व्हिस तोडली व आपल्या सर्व सर्व्हिस राखून ठेवत ६-३ असा सहज सेटसह सामनाही खिशात घातला. सिद्धांत सेंट व्हिन्सेंट शाळेत १२ वीमध्ये शिकत असून तो सोलारिस क्लब येथे सराव करतो.
मुलींच्या गटात अग्रमानांकित व गुजरातच्या आकांक्षा भान हिला तिसºया मानांकित व अहमदाबादच्या वैदेही चौधरी हिने पराभवाचा धक्का देऊन स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण संकल्प थाळी व डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस अजय गुप्ते, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि स्पर्धेचे संचालक सुधीर रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांना करंडक देण्यात आले. एकेरीतील विजेत्या सिद्धांत बांठिया आणि वैदेही चौधरीला ६० आयटीएफ गुण, उपविजेत्या अभिमन्यू आणि आकांक्षा हिला ४५ आयटीएफ गुण मिळाले.
मुख्य ड्रॉ : अंतिम फेरी
मुले : सिद्धांत बांठिया (भारत, १) वि. वि. अभिमन्यू वैण्णमरेड्डी (भारत, ७) ६-४, ६-३;
मुली : वैदेही चौधरी (भारत, ३) वि. वि. आकांक्षा भान (भारत, १) ६-२, ६-१.