भोसरी परिसरात मद्यपींचा होतोय त्रास
By admin | Published: April 29, 2017 04:05 AM2017-04-29T04:05:38+5:302017-04-29T04:05:38+5:30
पुणे-नाशिक महामार्ग तसेच टेल्को रस्ता परिसरात रस्त्यालगतच जुगार आणि मद्यपींनी बस्तान बसवले असून, भरदिवसा
भोसरी : पुणे-नाशिक महामार्ग तसेच टेल्को रस्ता परिसरात रस्त्यालगतच जुगार आणि मद्यपींनी बस्तान बसवले असून, भरदिवसा ठिकठिकाणी जुगार खेळणारांची आकडेमोड चाललेली दिसून येते. तसेच भोसरी उड्डाण पुलाखाली महामार्गालगतची दारूची दुकाने बंद केली असली तरीही मद्यपींच्या पार्ट्या ठिकठिकाणी रंगू लागल्या असल्याचे दिसून येते. मुख्य रस्त्यालगतच अशा अवैध अडड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या जुगार अड्ड्याबाबत पोलीस अनभिज्ञ आहेत की, जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
राज्य व राष्ट्रीय महामार्गांलगतची सर्व दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने भोसरी परिसरातीलही अनेक दुकाने बंद करण्याची वेळ हॉटेलचालकांवर आली आहे. पण ठिकठिकाणी छुप्या पद्धतीने दारूविक्री सुरू असल्याचे नागरिकांत चर्चा आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील परिसरात सर्रास मद्यपींचे घोळके ओपन बार पद्धतीने दारू पिऊन धिंगाणा घालताना दिसून येतात. बऱ्याचदा मद्यपींमध्ये वादावादी होऊन हाणामारीचे प्रकारही याभागात घडले आहेत. सोमवारी याच भागात मोकळ्या मैदानात एका इसमाचा खून केल्याचे आढळून आले. अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अशा अवैध अड्ड्यांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भोसरी टेल्को रस्त्यालगत दोन्ही बाजूस पालिकेने लॉन गार्डन व वृक्षारोपण करून त्यांची जोपासना केली आहे़ त्यामुळे याच भागात लांडेवाडी येथील इलेक्ट्रॉनिक सदन शेजारील झाडाझुडपांमध्ये तसेच बालाजीनगरमध्ये नागरिकांचे अड्डे दिवसेंदिवस वाढत आहेत. (वार्ताहर)