तळेगाव एमआयडीसीत ट्रक टर्मिनल अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:32 IST2024-12-20T12:31:51+5:302024-12-20T12:32:17+5:30
दोन महिन्यात सुरू होणार : वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

तळेगाव एमआयडीसीत ट्रक टर्मिनल अंतिम टप्प्यात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ट्रक तसेच अवजड वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून शहराच्या वेशीवरील एमआयडीसीच्या जागेत तळेगाव येथे दोन ट्रक टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत ते काम पूर्ण होणार असून यामुळे तळेगाव-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळू शकतो.
पुणे जिल्ह्यात तळेगाव, चाकण, पिंपरी, रांजणगाव, कारेगाव येथे एमआयडीसी क्षेत्र विकसित झाले आहे. तेथे वाहन निर्मितीसह अनेक लघु आणि मध्यम उद्योग सुरू आहेत. उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालापासून ते उत्पादित पक्क्या मालापर्यंत सर्व वाहतूक ट्रक, कंटेनर, ट्रेलरद्वारे केली जाते. दररोज पाच हजारांवर मालवाहतूक वाहने शहरातून ये-जा करतात.
वाहनचालकांना शहरात येईपर्यंत सकाळ उजाडते किंवा संध्याकाळ होते. पण, शहरात सकाळी आणि संध्याकाळी अवजड वाहनांना बंदी आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने शहराबाहेरच किंवा रस्त्याच्या कडेला थांबवावी लागतात. अरुंद रस्ते, अतिक्रमणे, बेशिस्त वाहनचालक आणि रस्त्यावरील पार्किंग वाहतूक कोंडीस जबाबदार आहे.
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई-पुणे महामार्गावरील तळेगाव एमआयडीसीत पुष्प संवर्धन केंद्राजवळ नाणोली फाट्यालगत १० हजार चौरस मीटर जागेवर एक आणि बधालेवाडी-मिंडेवाडी ७५ मीटर रस्त्यालगत ४० हजार चौरस मीटर जागेवर दुसरे प्रशस्त ट्रक टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या दोन्ही ट्रक टर्मिनलच्या कामाला मागच्या वर्षी सुरुवात झाली असून सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. तेथे चालकांसाठी प्रशस्त विश्रांतीगृह, स्वच्छतागृह, उपाहारगृह असणार आहे. वाहनांसाठी पार्किंग सुविधा, वाहनांचे सुटे भाग, देखभाल दुरुस्ती करणाऱ्या आस्थापनांसाठी गाळे उभारण्यात येत आहेत.
काम पूर्ण होताच निविदा प्रक्रिया
तळेगाव एमआयडीसीत उभारण्यात येत असलेल्या दोन्ही ट्रक टर्मिनलवर डांबरीकरण आणि प्रशस्त इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ट्रक टर्मिनल चालविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
टक्का १ - पुष्प संवर्धन केंद्र
एकूण जागा - १० हजार चौरस मीटर
वाहनांची पार्किंग क्षमता - २०० ट्रक
गाळ्यांची संख्या - ८
रेस्ट रूम - १०० चालकांसाठी
एकूण - ४.५ कोटी रुपये
टप्पा २ - बधालेवाडी-मिंडेवाडी
एकूण जागा - ४० हजार चौरस मीटर
वाहनांची पार्किंग क्षमता - ३५० ट्रक
गाळ्यांची संख्या - १२
रेस्ट रूम - २०० चालकांसाठी
एकूण - १५ कोटी रुपये
तळेगाव एमआयडीसीमधील दोन्ही ट्रक टर्मिनलची कामे अंतिम टप्प्यात आली असून, तीन-चार महिन्यांत ती कार्यान्वित होतील. यामध्ये चालकांसाठी सुसज्ज आरामकक्ष, कॅन्टीन आणि अवजड वाहनांची पार्किंगची सोय असणार आहे. - संजय कोतवाड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी