सामान्यांचे जीवन सुखी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत
By admin | Published: March 29, 2016 03:35 AM2016-03-29T03:35:05+5:302016-03-29T03:35:05+5:30
विद्यापीठांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारा आणि उद्योजक, तसेच ग्रामीण विकास डोळ्यांपुढे ठेवून करायला हवा. तसेच विद्यार्थ्यांची कल्पकता संशोधनात
आकुर्डी : विद्यापीठांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारा आणि उद्योजक, तसेच ग्रामीण विकास डोळ्यांपुढे ठेवून करायला हवा. तसेच विद्यार्थ्यांची कल्पकता संशोधनात उतरवून सामान्य माणसाचे जीवन सुखी होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केले.
आकुडीर्तील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित पिंपरी - चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या संगणक पदव्युत्तर पदवी परिषदेचे (सीपीजीकॉन २०१६) आयोजन करण्यात आले होते. या वेळी सीडॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. वाय. पी. नेरकर, ए. सी. एम. पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. आरती दीक्षित, बोर्ड आॅफ स्टडीजच्या समन्वयक डॉ. वर्षा पाटील, संस्थेचे विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर, अधिष्ठाता जे. एस. उमाळे, डॉ. के. राजेश्वरी, डॉ. ए. डी. ठाकरे, प्रा. संतोष सांबारे उपस्थित होते.
डॉ. गाडे पुढे म्हणाले की, शिक्षण, संशोधन, पैसा, गुंतवणूक, मनुष्यबळ आणि गरज यांचा योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प सादर करावेत. सामाजिक विकास हे शासनाचे धोरण आहे. अपेक्षित विकास अभियांत्रिकीतील तंत्रज्ञान आणि संशोधनाने होणार आहे. त्यासाठी प्राध्यापकांनी नवीन कल्पकता आणि नावीन्यता वापरून शिक्षणसंस्थांनी संशोधनपूरक वातावरण निर्माण करावे. देशाच्या सामाजिक व आर्थिक स्थितीशी संबंधित आपले संशोधन असावे.
या वेळी प्राचार्य फुलंबरकर म्हणाले की, संशोधकांनी समाजातील वंचित घटकांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग हा समाजातील समस्या सोडविण्यासाठी होणे आवश्यक आहे. तसेच संशोधन हे मानवी जीवनाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी व्हावे. सीडॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य फुलंबरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सोनाली पाटील व प्रा. दीपा आबीन यांनी सूत्रसंचालन केले. अनुराधा ठाकरे यांनी आभार मानले.(वार्ताहर)