मुख्यमंत्र्यासाठी पाऊणतास तुकोबांचा सोहळा वेठीस
By विश्वास मोरे | Published: June 29, 2024 08:38 PM2024-06-29T20:38:27+5:302024-06-29T20:39:39+5:30
वारकऱ्यांची नाराजी
विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा शनिवारी सव्वा पाच वाजता उद्योगनगरीत प्रवेशाला. दरवर्षीपेक्षा पाऊणतास उशिराने सोहळा शहरात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याने निगडीतील भक्ती- शक्ती चौकामध्ये सोहळा थांबविला होता. मुख्यमंत्र्याची हौस यामुळे पाऊण तास वारकऱ्यांना त्रास झाला. त्यामुळे वारकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर अर्थात भक्तीशक्ती चौकात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास चौघडा पोहोचला. तर साडेसहापर्यंत सोहळा चौकातच थांबला होता. यावेळी नागरीकांनी पुष्पवृष्ठी केली. त्यावेळी पावसाने हजेरी लावली.
वारकऱ्यांची नाराजी
पालखी सोहळा मार्गावर नदीप्रमाणे प्रवाही असतो. मात्र, सुमारे अर्धा तास सोहळा याच ठिकाणी थांबला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्यात सहभागी होणार आहेत, म्हणून सोहळा थांबला आहे, अशी चर्चाही रंगली होती. त्यामुळे देहूरोड सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वारकरी रस्त्यावर उभे होते. त्यानंतर पावणे सहाच्या सुमारास पुन्हा दिंड्या पुढे सरकू लागल्या. त्यानंतर पुन्हा काही काळ सोहळा थांबला. सोहळा का थांबला होता? याबाबतचे उत्तर सुरुवातीला मिळू शकले नाही. कारण पोलिसांनाही याबाबत खबर नव्हती. सुरुवातीला भक्ती- शक्ती चौकात मुख्यमंत्री येणार हॊते. मात्र, नियोजित ठिकाणी आले नाहीत. उशीर होत असल्याने सोहळा पुढे सरकला. पावणे सातला टिळक चौकात आला. त्यावेळी आळंदीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यांच्या बरोबर खासदार श्रीरंग बारणे होते. शिंदे आणि बारणे काही वेळवारीत पायी चालले. त्यानंतर रथावर बसून सारथ्यही केले. मुखमंत्र्यासाठी पाऊण तास सोहळा थांबविल्याबद्दल वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कारण दिंड्याना नेहमीच्या वेळेपेक्षा मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला.