आयुक्तपदी तुकाराम मुंढेंना नेमा
By admin | Published: April 19, 2017 04:17 AM2017-04-19T04:17:43+5:302017-04-19T04:17:43+5:30
तुकाराम मुंढे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली...
पिंपरी : तुकाराम मुंढे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे. त्यासाठी थोरात यांनी जनमत चाचणी घेतली. आठ दिवसांत तब्बल १२ हजार नागरिकांनी जनमत चाचणीत मत नोंदणी करून तुकाराम मुंढे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अमोल थोरात यांनी याबाबत निवेदन दिले आहे. थोरात म्हणाले,‘‘गेल्या काही वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचा गैरवापर केला होता. त्यामुळे सर्वच स्तरावर गलथानपणा वाढून भ्रष्ट कारभाराला चालना मिळाली होती. मतदारांनी पारदर्शी कारभाराच्या आश्वासनाला पसंती देत भाजपला निवडून दिले.
सध्याच्या आयुक्तांना बदलीचे वेध लागले आहेत. आला दिवस ढकलायचा, या धोरणानुसार कामकाज सुरू आहे. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्याचप्रमाणे महापालिकेचे धोरण, विकासकामांचे नियोजन, अनेक प्रकल्पांचे प्रस्ताव, नियोजन आदींबाबत महापालिका प्रशासन उदासीन दिसून येत आहे. त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये बेशिस्ती वाढली आहे. महापालिकेचा पारदर्शक कारभार करण्यासाठी आयुक्तपदी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती होणे गरजेचे आहे. तुकाराम मुंढे सक्षम आणि प्रशासनावर पकड असलेले अधिकारी आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाल्यास महापालिकेचा कारभार पारदर्शक होण्यास मदत होईल. तसेच शहराचा सर्वांगिणीक विकास होईल. अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)