तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण
By Admin | Published: June 16, 2017 04:54 PM2017-06-16T16:54:20+5:302017-06-16T16:54:20+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या ३३२ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यास काही वेळातच सुरुवात होणार आहे. इंद्रायणी तीरावरील
विश्वास मोरे/ऑनलाइन लोकमत
देहूगाव, दि. 16 - जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या ३३२ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यास काही वेळातच सुरुवात होणार आहे. इंद्रायणी तीरावरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिंड्या दाखल होऊ लागल्या आहेत. हरिनामाने देहूनगरी गजबजली आहे.
शुक्रवारी पहाटे पाचला श्रींची महापूजा व शिळामंदिरातील महापूजा पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्तांच्या हस्ते झाली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज समाधीची महापूजा, सहाला विश्वस्त व मनुशेठ वालिया परिवाराच्या हस्ते महापूजा झाली. सकाळ पासूनच पालखी सोहळ्याची तयारी सुरु होती. सकाळी १० ला संभाजीमहाराज मोरे यांचे पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन झाले. सकाळी ९ ला दरम्यान तुकोबारायांच्या पादुकांची इनामदार वाड्यात दिलीपमहाराज मोरे इनामदार यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात प्रस्थानपूर्व पूजेसाठी आणल्या गेल्या. दुपारी २.३० च्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ आहे.
कडेकाट बंदोबस्त
प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालक मंत्री गिरीष बापट ,खासदार श्रीरंग बारणे , पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे दाखल झाले आहेत. ३२ सीसीटीव्ही कॅमेºयांची संपूर्ण मंदिर परिसरावर नजर आहे.
आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील वारकरी, भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. ठिकठिकाणी भजन, हरिभजनात दंग झाल्याचे दिसत आहे. सर्वत्र हरिनामाचा गजर ऐकू येत असून, येथील मुख्य मंदिराच्या (देऊळवाडा) आवारात भाविकांचा फुगड्यांचा खेळ रंगु लागले आहेत. वारकरी पताका व महिला तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन आनंदात नाचत, अभंग गात प्रदक्षिणा घालत असल्याचे दिसून आले.
आरोग्य विभागाच्या वतीने आठ वैद्यकीय अधिकारी, सहा औषध निर्माते, तीन आरोग्य सहायक, १४ आरोग्यसेविका, १४ आरोग्यसेवक, १०८ टीमच्या दोन रुग्णवाहिका, एक कार्डियाक रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पोलीस व संस्थानच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवेशद्वारत धातूशोधक यंत्र, सीसी कॅमेरे, दर्शनबारी, भाविकांना आत येण्याचा मार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था, प्रदक्षिणा मार्ग, पालखीच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पालखी सोहळा आकुर्डीकडे सुरक्षित जाण्यासाठी वहातुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.१७ जुनला पहाटे चार वाजल्यापासुन तळेगाव चाकण रस्ता ते देहूगाव, आळंदी ते देहूगाव व देहूरोड ते देहूगाव हे तीनही मार्ग वहातुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. दिंड्यांची वाहने दिंडी चालकांनी तळवडे निगडी मार्गे आकुडीर्ला न्यावीत. या दिवशी आपली वाहने या मार्गांवर न आणता पयार्यी मागार्ने न्यावीत असे अवाहन पोलीसांनी केले आहे. गर्दीच्या काळात देहूकडे येणारी वाहतूक तळवडे मार्गे व चाकण मार्गे व निगडीतून रावेत मार्गे सेंट्रल चौक अशी वळविण्यात येणार असून कोणत्याही पालखी सोबत पासधारक जड वाहनांशिवाय कोणत्याही वाहनांना प्रवेश देण्यात नाही.