आवाज वाढव डीजे! पिंपरीत १०८ मंडळांना दणका, विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 10:05 AM2023-10-02T10:05:28+5:302023-10-02T10:05:47+5:30
सर्व मंडळांवर कारवाई करण्यात येणार, पोलीस प्रशासनाचा इशारा
पिंपरी : उद्योगनगरीत साडेआठ तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’च्या दणदणाटाने कानठळ्या बसवल्या. तब्बल १०८ मंडळांनी रात्रीसाठी ठरवून दिलेली आवाजाची ७० डेसिबलची पातळी ओलांडली. या सर्व मंडळावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. याविषयीचा अहवाल पोलिस न्यायालयात सादर करणार आहेत.
गुरुवारी (दि. २८) गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मंडळांच्या आवाजाची पातळी मोजण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून केले जाते. जी मंडळे नियमांचे पालन न करता ‘डीजे’चा आवाज वाढवतात, त्यांच्यावर कारवाई केली जाते. यंदा १०८ मंडळांनी आवाजाची पातळी ओलांडल्याने पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. मंडळांच्या मिरवणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘डीजे’चा आवाज १०० पार
पुणे शहरात गणेशोत्सवातील आवाजाची पातळी मोजण्याचे काम दरवर्षी ‘सीईओपी’कडून होते. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये आवाज मोजण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. पोलिसांकडूनच याची नोंद ठेवली जाते. नियमानुसार रात्री ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाज नसावा, तसेच मनुष्यवस्ती असलेल्या ठिकाणी याहून कमी आवाजाची मर्यादा आहे. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत आवाजाने १०० डेसिबल पार केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात येत आहे.
किती हवा आवाज?
सार्वजनिक कार्यक्रमासाठी वाद्यांचे आवाज किती असावेत, याची मर्यादा ठरवून दिलेली आहे. साधारणपणे दिवसा औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल, रात्री ७० डेसिबल ही मर्यादा निश्चित केली आहे. निवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबलची मर्यादा आहे.
''पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १०८ मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली. या मंडळांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांचा अहवाल तयार करून तो न्यायालयात सादर केला जाणार आहे. एका मंडळावर खटला दाखल करण्यात आला आहे. - सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड''