अठ्ठेचाळीस प्रभाग झाले स्वच्छ
By admin | Published: December 30, 2016 04:36 AM2016-12-30T04:36:54+5:302016-12-30T04:36:54+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या टप्प्यात ६४ पैकी ४८ प्रभाग हगणदरीमुक्त केले आहेत. देशातील पहिल्या दहा स्वच्छ
पिंपरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या टप्प्यात ६४ पैकी ४८ प्रभाग हगणदरीमुक्त केले आहेत. देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांत आपला क्रमांक कायम ठेवण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात दिनांक ४ ते ६ सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख आणि सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत २० जानेवारीपर्यंत हे सर्व्हेक्षण सुरू राहणार आहे. या संदर्भातील माहिती महापालिकेतील स्वच्छ भारत अभियानांतर्गत नियोजनाची बैठक झाली. या वेळी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, संगणक विभागप्रमुख निळकंठ पोमण, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या वतीने झालेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात पिंपरी-चिंचवड शहराने देशात नववा, तर राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ अभियान २०१९ पर्यंत राबविण्यात येत आहे. यामध्ये देशातील प्रत्येक शहरातील कुटुंबाकडे वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतागृह, घन कचरा व्यवस्थापन, संकलन व वर्गीकरण आणि स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँडिंग याचा विचार केला जातो. दोन हजार गुण निश्चित केले आहेत. शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी व घनकचरा व्यवस्थापनासाठी व स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँडिंगसाठी प्रत्येकी पाच, कचरा संकलन व वाहतूकसाठी चाळीस, कचरा विल्हेवाट वीस, सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहासाठी पंधरा, तर घरगुती स्वच्छतागृहासाठी पंधरा असे मिळून शंभर गुण निश्चित केले आहेत. महापालिकेमार्फत डेटा संकलनासाठी तब्बल नऊशे गुण, तर थेट निरीक्षणमार्फत डेटा संकलनासाठी पाचशे गुण, नागरिकांचा अभिप्राय डेटा संकलनासाठी सहाशे असे मिळून असे दोन हजार गुण असणार आहेत. नागरिकांच्या सहभागासाठी टोल फ्री नंबर दिला आहे. गेल्या वर्षी नववा क्रमांक मिळवला होता. मात्र, त्या वेळी स्पर्धेत केवळ ७५ शहरे होती. या वेळी स्पर्धा वाढली असून, एकूण पाचशे शहरे स्पर्धेत उतरली आहे. (प्रतिनिधी)
3000 स्वच्छतागृहांचे काम पूर्ण
पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतागृह नसणाऱ्यांना शौचालय बांधून देण्यात येत आहे. त्यासाठी सोळा हजार रुपयांचे अनुदान असणार आहे. स्वच्छतागृहासाठी महापालिकेकडे सात हजार नागरिकांनी अर्ज केले. यामध्ये सव्वाचार हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता ३५१ कोटी ४०२ लाभार्थ्यांना दिला आहे. सुमारे साडेतीन हजार स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे.
48 प्रभाग हगणदरीमुक्त
महापालिकेच्या जुन्या प्रभाग रचनेनुसार ६४ प्रभाग आहेत. यापैकी ४८ प्रभाग हे हगणदरीमुक्त झाले असून, उर्वरित मार्चअखेर
हगणदरीमुक्त करण्याचा महापालिकेचा मानस आहे. सीएसआर अंतर्गतही शहरात सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी पाच कंपन्यांनी तयारी दाखविली आहे.