Eid e milad: ईद-ए-मिलादनिमित्त बंदोबस्तासाठी पिंपरीत अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा
By नारायण बडगुजर | Published: September 29, 2023 06:09 PM2023-09-29T18:09:19+5:302023-09-29T18:09:43+5:30
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पिंपरी - चिंचवड पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त
पिंपरी : हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलाद) निमित्त पिंपरी येथे शनिवारी (दि. ३०) मिरवणूक आणि सभेचे आयोजन केले आहे. त्यासोबत शहरात ठीक ठिकाणी ईद-ए-मिलाद साजरी होणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे शहरात अडीच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
मिलिंदनगर पिंपरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी यादरम्यान शनिवारी मिरवणूक काढली जाणार आहे. चिखली, नेहरूनगर, वाकड, काळेवाडी, भोसरी, निगडी, कासारवाडी येथील २० मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील. मिरवणूक झाल्यानंतर पिंपरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील मैदानात सभा होईल. या सभेसाठी सात ते आठ हजार नागरिक येणार असल्याचे आयोजकांनी पोलिसांना सांगितले आहे.
शहरात ठिकाणी ईद-ए-मिलाद निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पिंपरी - चिंचवड पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. सण-उत्सव शांततेत पार पाडावेत, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहरातील पोलिस बंदोबस्त
अपर पोलिस आयुक्त - ०१
पोलिस उपायुक्त - ०५
सहायक पोलिस आयुक्त - ०७
पोलिस निरीक्षक - ५५
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक - १६४
पोलिस अंमलदार - १७७९
होमगार्ड - २३९
वॉर्डन - १६८
एसआरपीएफ - १ कंपनी (१०० जवान)
आरसीपी - ०४
स्ट्राईकिंग - १५
बीडीडीएस पथक - ०१