रावण टोळीच्या म्होरक्यासह दोघांना अटक; पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:27 PM2020-09-19T17:27:29+5:302020-09-19T17:27:58+5:30
चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाची कामगिरी
पिंपरी : कुख्यात रावण टोळीच्या म्होरक्यासह दोघांना पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.
विकी ऊर्फ अनिरूद्ध राजू जाधव (वय २४), मन्या ऊर्फ नंदकिशोर शेषराव हाडे (वय २२, दोघे रा. रावेत), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. झिरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तपास पथकाकडून गस्त घालण्यात येत आहे. गुरूद्वारा चौकाकडून तहसील कार्यालयाकडे रेल्वे पटरीच्या खालून जाणाºया रोडच्या बाजूस दोन इसम संशयीतरित्या फिरत आहेत. त्यातील एका इसमाच्या कमरेला हत्यार दिसत आहे, अशी माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. आरोपी जाधव याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. तसेच आरोपी हाडे याच्याकडे दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांच्याकडून ३५ हजार ५०० रुपयांचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला.
आरोपी जाधव हा सध्या रावण टोळीचा म्होरक्या व सराईत गुन्हेगार असून नुकताच मोक्याच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटला आहे. तसेच तो देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे. तर आरोपी हाडे हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, भाऊसाहेब मोईकर, स्वप्नील शेलार, रुषीकेश पाटील, विजयकुमार आखाडे, पंकज भदाणे, गोविंद डोके, अमोल माने, सदानंद रुद्राक्षे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.