Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन घरफोड्या, दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 03:14 PM2021-11-15T15:14:22+5:302021-11-15T15:17:48+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे घर शनिवारी (दि. १३) साडेअकरा ते रविवारी (दि. १४) दुपारी बारा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून आठ लाख ३५ हजार ९५ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली.
पिंपरी : शहरात लुटमारीसह घरफोडीचे दोन प्रकार घडले. घरफोड्यांच्या घटनांमध्ये चोरट्यांनी नऊ लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला. तर दुचाकीस्वाराला मारहाण करून २३ हजार ७४० रुपये जबरदस्तीने घेत लुटमार केली. याप्रकरणी दिघी व निगडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १४) गुन्हे दाखल करण्यात आले.
योगेश नामदेव दरेकर (वय ३०, रा. चऱ्होली, पुणे, मूळ रा. सुमननगर, लासलगाव, ता. निफाड, नाशिक) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे घर शनिवारी (दि. १३) साडेअकरा ते रविवारी (दि. १४) दुपारी बारा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने घराचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून आठ लाख ३५ हजार ९५ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. तसेच फिर्यादीच्या घराशेजारी राहणारे अभिजित सुरेश कांबळे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून चोरट्यांनी ८० हजार १०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी नऊ लाख १५ हजार १९५ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
मारहाण करून दुचाकीस्वारास लुटले
मुकुंद अशोक भंडारी (वय २८, रा. हडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार धुनगाव, भाव्या बाविसकर (दोघे रा. ओटास्कीम, निगडी) आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. शनिवारी (दि. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या बहिणीला भेटून परत हडपसर येथे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी ओटास्किम येथे चिकन चौकाजवळ आरोपींनी फिर्यादीला अडवून शिवीगाळ व दमदाटी करून पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे धुनगाव याने कोयत्याने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले. अन्य आरोपींनीही शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपी भाव्या याने दगडाने मारून फिर्यादीच्या खिशातून जबरदस्तीने २३ हजार ७४० रुपये काढून घेतले