पिंपरीत दोन घरफोड्या; सव्वा पाच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 08:39 PM2021-08-03T20:39:12+5:302021-08-03T20:40:09+5:30
चोरट्यांनी पाच लाख २१ हजारांचा ऐवज लंपास केला.
पिंपरी : अजमेरा कॉलनी येथे घरफोडीचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये पाच लाख २१ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत सोमवारी (दि. ०२) त्यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात नितीन मोहन क्षीरसागर (वय ३२, रा. अजमेरा हाउसिंग सोसायटी, म्हासुळकर कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी क्षिरसागर त्यांच्या सासऱ्यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी शनिवारी (दि. ३१) दुपारी चार वाजता देहूगाव येथे गेले. कार्यक्रम झाल्यानंतर ते सोमवारी (दि. ०२) सकाळी साडेआठ वाजता देहूगाव येथून परत आले दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घराच्या बेडरूममधील कपाटात ठेवलेले तीन लाख ९१ हजार रुपये किमतीचे ६५ ग्रॅम वजनाचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेली.
दुसऱ्या प्रकरणात सतीश दामोदर कट्यारमल (वय ४८, रा. ग्रीन फील्ड हाऊसिंग सोसायटी, अजमेरा कॉलनी जवळ, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रविवारी (दि.०१) दुपारी बारा वाजता फिरण्यासाठी बाहेर गेले. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातील देवघरात असलेल्या कपाटातून दोन लाख ३० हजार रुपये किमतीचे १३ तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.