मोबाईल फोन चोरी प्रकरणी तिघांवर जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:59 PM2021-07-31T18:59:21+5:302021-07-31T19:00:09+5:30
या घटना इंद्रायणीनगर आणि एमआयडीसी भोसरी येथे घडल्या.
पिंपरी : मोबाईल फोन चोरी प्रकरणी तीन चोरट्यांवर जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल केले. या घटना इंद्रायणीनगर आणि एमआयडीसी भोसरी येथे घडल्या.
श्रीकांत अंबादास वाघमाडे (वय १९), श्रेयस मोरेश्वर शेळके (वय १९) आणि ओमकार गंगाराम गायकवाड (वय २०, तिघेही रा. चिखली), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पहिल्या गुन्ह्यात तानाजी बिरप्पा गारले (वय २५, रा. जाधववाडी, चिखली) यांनी शनिवारी (दि. ३१) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च २०२१ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी गारले हे एमआयडीसी भोसरी येथील व्यंकटेश लेझर कंपनीजवळून सायकलवरून घरी चालले होते. त्यावेळी तीन चोरट्यांनी गारले यांना धक्का देऊन सायकलवरून खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या खिशातून पाच हजार रुपये किंमतीचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेला.
जबरी चोरीच्या दुसऱ्या गुन्ह्यात शंकर शिवाजी तेलगावे (वय २६, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी शनिवारी (दि. ३१) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैला सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी शंकर हे सायकलवरून घरी चालले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना धक्का देऊन सायकलवरून खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या खिशातील १० हजार रुपये किंमतीचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेला.