चिखलीत २४ तासांच्या आत दोघा जणांची आत्महत्या; तरुणासह ज्येष्ठ नागरिकाने संपवलं जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:28 PM2021-06-21T22:28:24+5:302021-06-21T22:28:43+5:30

ज्येष्ठाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. तर तरुणाच्या आत्हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Two commit suicide in Chikhali within 24 hours; A senior citizen and youth ended life | चिखलीत २४ तासांच्या आत दोघा जणांची आत्महत्या; तरुणासह ज्येष्ठ नागरिकाने संपवलं जीवन 

चिखलीत २४ तासांच्या आत दोघा जणांची आत्महत्या; तरुणासह ज्येष्ठ नागरिकाने संपवलं जीवन 

googlenewsNext

पिंपरी : चिखली परिसरातील घरकुल येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या तरुणासह एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. यातील पहिली घटना रविवारी (दि. २०) रात्री साडेआठच्या सुमारास तर दुसरी घटना सोमवारी (दि. २१) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. जेष्ठाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. तर तरुणाच्या आत्हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

रवीकुमार अलाप्पा बलीजा (वय २०, रा. इमारत क्रमांक एफ २१, घरकुल), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला रवीकुमार बलीजा हा घरकुल येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहण्यास होता. तो राहत असलेली इमारत सात मजल्यांची असून, त्या इमारतीच्या टेरेसवर काही जण नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जातात. त्यानुसार रवीकुमार हा रविवारी सायंकाळी इमारतीच्या टेरेसवर व्यायामासाठी गेला. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास टेरेसवरून त्याने उडी मारली. त्याच्या घरच्यांनी त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आत्महत्येची दुसरी घटना घरकुल येथील इमारत क्रमांक ए १६ येथे घडली. रोहिदास रावजी पिंगळे (वय ६१, रा. इमारत क्रमांक बी ८, घरकुल), असे आत्महत्या केलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलीस हवालदार नरेंद्र राजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पिंगळे यांच्यावर मानसोपचार सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना आजार होता. मुलगा, सून व पत्नी यांच्यासह ते घरकुल येथे राहत होते. रोहिदास यांचा मुलगा सोमवारी मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर वडील रोहिदास घरात दिसून आले नाहीत म्हणून त्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. त्यानंतर मुलगा कामावर निघून गेला. त्यानंतर रोहिदास यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास घरकुल येथील ए १६ क्रमांकाच्या इमारतीवरून उडी मारली. तेथील काही जणांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांचा मुलगा कामावरून परत आला. रोहिदास यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. 

दरम्यान, मयत रोहिदास यांच्या खिशात त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली. आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Two commit suicide in Chikhali within 24 hours; A senior citizen and youth ended life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.