ई-मेल हॅक करून केला फ्रॉड ; फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांना मिळाले ५० लाख परत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:46 PM2019-10-15T15:46:37+5:302019-10-15T15:47:21+5:30
विदेशातील बँकांकडून मिळविली रक्कम
पिंपरी : विदेशातील कंपनीकडून माल खरेदी करण्यासाठी ई-मेलद्वारे संपर्क साधला. मात्र हॅकरने विदेशी कंपनीचा ई-मेल हॅक करून बँक बदलली असून नवीन खात्यावर रक्कम भरण्यास सांगितले. भारतीय कंपनीने त्यानुसार रक्कम अदा केली. मात्र संबंधित विदेशी कंपनीने पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. या फसवणूकप्रकरणी पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलने विदेशी बँकांकडे संपर्क साधला. ह्यपेमेंट गेटवेह्णद्वारे हा ह्यफ्रॉडह्ण झाल्याचे सिद्ध केले. त्यामुळे विदेशातील बँकांत गेलेले ५० लाख ७६ हजार ३३७ रुपये भारतातील फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांना परत मिळाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील मित्तल प्रिसिजन प्रेशर डाय कास्टिंग एलएलपी आणि लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल, असे फसवणूक झालेल्या दोन कंपन्यांची नावे आहेत. मधुसूदन अग्रवाल व सुनील मित्तल हे दोघे मित्तल प्रिसिजन या कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या कंपनीने एका चिनी कंपनीकडून एक उत्पादन खरेदी केले होते. त्याची रक्कम देण्यासाठी मित्तल यांनी चिनी कंपनीकडे त्यांचे बँक खात्याची माहिती ई-मेलद्वारे मागविली. त्यानुसार चिनी कंपनीने २१ आॅगस्ट २०१९ रोजी त्यांच्या बँक खात्याची माहिती दिली. परंतु २४ आॅगस्ट रोजी एक ई-मेल आयडीवरून कळविण्यात आले की, सदरची चिनी कंपनी त्यांची बँक व खाते बदलत आहे. त्यानुसार युके येथील बँकेच्या खात्यात पैसे पाठविण्याचे ई-मेलद्वारे सांगण्यात आले. त्यानुसार मित्तल यांच्या कंपनीने ६२ हजार १० यूएस डॉलर भारतीय चलनानुसार ४४ लाख ७९ हजार ९१७ रुपये चिनी कंपनीच्या बदललेल्या बँक खात्यात जमा केले. तसेच त्याबाबत चिनी कंपनीला कळविण्यात आले. मात्र पैसे मिळाले नसल्याचे चिनी कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे ई-मेल आयडीच्या दोन अक्षरात अदलाबदल करून फसवणूक करण्यात आल्याचे मित्तल यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली. विदेशातील कंपनीचा ई-मेल हॅक झाल्याचे समोर आले. त्यानंतर युकेतील संबंधित बँकेकडे ई-मेलद्वारे संपर्क साधून सदरच्या खात्यातील व्यवहार थांबविण्याबाबत सांगण्यात आले. सदरचा व्यवहार पेमेंट गेटवेद्वारे झाल्याने संबंधित दुसºया बँकेलाही याबाबत ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली. त्यानंतर याबाबत सतत संपर्क साधून विदेशातील संबंधित बँकेकडून ४४ लाख ७९ हजार ९१७ रुपये मित्तल यांच्या कंपनीला परत मिळवून देण्यात आले.
लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल कंपनी विदेशातील कंपनीकडून रॉ-मटेरियल घेते. लुमिनियस कंपनीला ई-मेल आला की, विदेशी कंपनीशी संबंधित दोन्ही ई-मेल आयडी बंद झाले असून, आपल्याला काही रॉ-मटेरियल लागत असल्यास आम्हाला नवीन आयडीवर ई-मेल करावा. त्यानुसार मटेरियलची मागणी केली असता पाच लाख ९७ हजार ३७६ रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मटेरियल मिळण्याबाबत संबंधित विदेशी कंपनीशी संपर्क साधण्यात आला. आम्हाला आपल्या कंपनीकडून पैसे मिळाले नाहीत. तसेच आमचा कोणताही ई-मेल आयडी बंद झाला नसल्याचे संबंधित विदेशी कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानंतर विदेशी बँकेशी संपर्क साधून सदरचा व्यवहार थांबविण्याबाबत सायबर सेलच्या पोलिसांकडून माहिती देण्यात आली. त्यानुसार न्यूयॉर्क येथील बँकेने पैसे परत केल्याने पाच लाख ९७ हजार ३७३ रुपये लुमिनियस कंपनीला मिळाले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक विजय गरूड, पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोडखे, स्वाती लामखडे, पोलीस कर्मचारी मनोज राठोड, भास्कर भारती, अतुल लोखंडे, नीतेश बिचेवार, विशाल गायकवाड, पोपट हुलगे, प्रदीप गायकवाड, युवराज माने, कृष्णा गवळी, नाजुका हुलवळे, स्वप्नाली जेधे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.