नगरपंचायतीच्या इमारतीसाठी दोन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:03 AM2018-08-28T00:03:21+5:302018-08-28T00:03:43+5:30
बाळा भेगडे : बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवकांनी मांडल्या व्यथा
वडगाव मावळ : वडगाव नगर पंचायत कार्यालयाच्या जागेत अवघ्या चारच खोल्या असल्याने नगरसेवक व नागरिकांना त्याचा फटका बसू लागला आहे. याबाबतचे वृत्त १८ आॅगस्टला ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झाले होते. सोमवारी सर्व नगरसेवकांनी आमदार बाळा भेगडे यांची भेट घेऊन चर्चा केली. या इमारतीसाठी तत्काळ दोन कोटी रुपये निधी देणार असल्याचे आमदारांनी जाहीर केले.
वडगाव नगरपंचायतीच्या जागी ग्रामपंचायत कार्यालय होते. त्याच ठिकाणी नगरपंचायतीचे कार्यालय सुरू झाले. इमारतीच्या खालच्या भागाचे बांधकाम करण्यात आले असून, त्या ठिकाणी चारच रूम आहेत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना बसण्यासाठी दोन लहान केबीन केली आहे. नागरिकांना, तसेच नगरपंचायत सदस्य यांना बसण्यासाठी जागा नाही. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते.
सोमवारी आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर,भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक सुनील ढोरे, चंद्रजित वाघमारे, प्रवीण चव्हाण, राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, सुनीता भिलारे आदी उपस्थित होते.
नगरपंचायतीत बांधकाम अभियंता यांची बाळा भेगडे यांनी तत्काळ नियुक्ती करण्याचे आदेश दिले. विविध विकास कामाबाबत प्रस्ताव तयार करून ते पाठवा. त्या कामांबाबत मी तत्काळ मंजूर करून घेतो. शहराच्या विकासासाठी तुम्ही सर्वांनी महत्त्वाच्या कामाबाबत वेगवेगळे प्रस्ताव तयार करून पाठपुरावा करत राहा, तुमच्या नगसेवकांच्या बैठकीत ठराव पास झाले म्हणजे काम झाले नाही त्याचा पाठपुरावा केला तरच कामे होतात अन्यथा पाच वर्षे कधी जातील हेही तुम्हाला कळणार नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले.