Pimpri Chinchwad: धावत्या लोकलमधून पडल्याने दोघांचा मृत्यू, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
By नारायण बडगुजर | Published: April 1, 2024 02:46 PM2024-04-01T14:46:12+5:302024-04-01T14:57:09+5:30
या दोन्ही मृतांची ओळख पटविण्यात येत आहे....
पिंपरी : देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ धावत्या लोकलमधून पडून जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेतून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या दोन्ही मृतांची ओळख पटविण्यात येत आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड रेल्वे स्टेशनजवळ रविवारी (दि. ३१) दुपारी चारच्या सुमारस ७० वर्षीय महिला लोकल गाडीतून पडून जखमी झाली. तिला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. चेहरा उभट, नाक सरळ, कपाळ सपाट, अंगाने सडपातळ, रंगाने गहू वर्ण, डोक्याचे केस काळे -पांढरे लांब, लालसर चौकडी फुलाची साडी, लाल ब्लाऊज असे कपडे असून महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ ४५ वर्षीय एक अनोळखी व्यक्ती कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून खाली पडून जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने सडपातळ, रंगाने काळा सावळा, उंची पाच फूट दोन इंच, अंगात कपडे लाल रंगाचा बनियन, गुलाबी रंगाचा फुल शर्ट, नेसणेस राखाडी रंगाची फुल पँट, उजव्या हाताच्या आई असे नाव गोंधलेले असे वर्णन आहे. या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.