चोरट्यांच्या दोन टोळ्या गजाआड, १६ गुन्हे उघड, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:48 AM2017-09-16T02:48:19+5:302017-09-16T02:48:32+5:30
गणेशोत्सवानिमित्त चिंचवड परिसरात गस्त घालीत असताना दुचाकीवर चाललेल्या ३ जणांना पोलिसांनी हटकले़ मात्र ते न थांबता पळून जाऊ लागले. पाठलाग करून पकडले असता उडवा उडावीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहन चोरीचे असल्याचे उघड झाल्यावर अधिक माहिती घेतली असता त्यांनी घरफोडी, मोबाइल व वाहनचोरी केल्याचे समोर आले.
चिंचवड : गणेशोत्सवानिमित्त चिंचवड परिसरात गस्त घालीत असताना दुचाकीवर चाललेल्या ३ जणांना पोलिसांनी हटकले़ मात्र ते न थांबता पळून जाऊ लागले. पाठलाग करून पकडले असता उडवा उडावीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहन चोरीचे असल्याचे उघड झाल्यावर अधिक माहिती घेतली असता त्यांनी घरफोडी, मोबाइल व वाहनचोरी केल्याचे समोर आले. दोन वेगवेगळ्या घटनेत चिंचवड पोलिसांनी १६ गुन्हे उघड आणून सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
वाल्हेकरवाडी परिसरात १३ सप्टेंबरला सहायक निरीक्षक सतीश कांबळे नाईक स्वप्निल शेलार, विजयकुमार आखाडे व इतर कर्मचारी गस्त घालत असताना त्यांनी या संशयीत वाहनाचा पाठलाग करून तिघांना पकडले. ते वाल्हेकरवाडीकडे जात होते. मात्र त्यांनी काळेवाडीला जात असल्याचे सांगितल्याने पोलिसांना संशय आला. तपासात त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. अजून एक सहभागी असल्याचे उघड झाले.
सर्वांना ताब्यात घेऊन पोलिसांनी १९ तोळे सोने-चांदीचे दागिने, एक कार, ५७ हजार रोख रक्कम, एक दुचाकी, दोन मोबाइल असा १६ लाख ४३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गणेश दगडू शिंदे (२४, रा. मुळशी), दिलीप ऊर्फ अजय दुर्गेश शिकरे (१९, रा. कामशेत), रोहिदास ऊर्फ काश्या संभाजी पवार (२४, रा. शिवणे), प्रमोद रामा क्षीरसागर (३६, रा. लोणावळा) यांना अटक केली.
दुसºया घटनेत दळवीनगर रोडवर उपनिरीक्षक सुभाष डिगे, नाईक सुधाकर आवताडे, अशोक आटोळे व इतर कर्मचारी गस्त घालत असताना दुचाकीवरील नितीन हरी वेताळ (१८, रा. पर्वती पायथा, पुणे), आकाश विठ्ठल जगताप (१८, रा. निगडी) यांना तपासणीत अडविले. त्यांच्याकडे लोखंडी पाना मिळून आला. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. अटक करून तपासात त्यांनी घरफोडी व वाहनचोरी केल्याचे निष्पन्न झाले. ५ दुचाकी एलईडी टीव्ही, लॅपटॉप, १० ग्रॅम सोन्याची अंगठी, मोबाइल असा २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
दोन्ही टोळ्यांनी मिळून चिंचवड, वाकड, हिंजवडी, पिंपरी, सांगवी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, पौड या भागांत १६ गुन्हे केल्याचे समोर आले. या गुन्ह्यांमध्ये १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक एस़ डिगे, अशोक आटोळे, स्वप्निल शेलार, सुधाकर आवताडे, विजयकुमार आखाडे, चंद्रकांत गडदे, ऋषीकेश पाटील, राहुल मिसाळ, सचिन वरणेकर, अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाणे, नितीन राठोड, रूपाली पुरीगोसावी, कांचन घवले यांनी केली.