पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात लाथाबुक्क्या आणि दांडक्याने हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 06:01 PM2021-06-24T18:01:25+5:302021-06-24T18:01:32+5:30
परस्पर विरोधात गुन्हा दाखल, पिंपरीच्या गिलबिलेनगरमधील घटना
पिंपरी: पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री गिलबिलेनगर, मोशी येथे ही घटना घडली आहे. वैजनाथ शिवाजी मांजरे, पिराजी शिवाजी मांजरे, पिराजी यल्लाप्पा मांजरे, गंगाराम शिवाजी मांजरे (सर्व रा. गिलबिलेनगर, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कृष्णा मारुती येडके (वय १७, रा. गिलबिलेनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पिराजी शिवाजी मांजरे हा येडके यांच्या घरी आला. त्यांचा भाऊ रामेश्वर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून येडके यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ केली. त्यानंतर पिराजी मांजरेने याने येडके यांना घराबाहेर ओढले. त्यानंतर ते आणि त्यांचा भाऊ लखन या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर वैजनाथ याने येडके यांच्या डोक्यात दांडक्याने मारून जखमी केले.
याच्या परस्पर विरोधात वैजनाथ शिवाजी चमकुरे (वय २५, रा. गिलबिलेनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामू एडके, सायबु मांजरे, कृष्णा मांजरे कुष्णा येडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांनी चमकुरे आणि त्यांच्या भावाला मारहाण केली होती. त्याबाबत आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी त्यांच्या घरासमोर येऊन तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. चमकुरे यांनी तक्रार मागे घेणार नसल्याचे सांगितल्यावर त्यांना आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले