प्रमाणपत्रासाठी दोन तास विद्यार्थी ताटकळत, पालकांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 02:53 AM2017-11-30T02:53:07+5:302017-11-30T02:54:31+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या वतीने ‘वाइल्ड लाइफ वीक’च्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण बुधवारी झाले.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या वतीने ‘वाइल्ड लाइफ वीक’च्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण बुधवारी झाले. अधिका-यांच्या प्रमाणपत्रावरील सहीसाठी आणि प्रभागाध्यक्ष वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना सुमारे दोन तास ताटकळावे लागले. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली.
चिंचवड येथील संभाजीनगरात महापालिकेचे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय आहे. शहरपातळीवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण बुधवारी आयोजित केले होते. या कार्यक्रमास महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच या स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना महापालिकेकडून प्रमाणपत्र दिले जाणार होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी चारची होती. त्यामुळे बक्षीसपात्र विद्यार्थी व पालक वेळेवर हजर होते.
काही लोकप्रतिनिधीही वेळेवर कार्यक्रमास उपस्थित होते. मात्र, कार्यक्रम काही सुरू होत नव्हता. या वेळी पालकांनी चौकशी केली असता, प्रभागाध्यक्षांना येण्यास वेळ आहे, ते आल्यावर कार्यक्रम सुरू केला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र,
कारण दुसरेच होते. बक्षीसपात्र विद्यार्थी आले असले, तरी त्यांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे कार्यक्रमस्थळी आली नव्हती. त्यामुळे कार्यक्रमास आलेल्यांना ताटकळत बसावे लागले.
ऐनवेळी अधिकाºयांची सही करण्यासाठी लगबग
महापालिका भवनात तिसºया मजल्यावर अतिरिक्त आयुक्तांचे कार्यालय आहे. उद्यान विभाग त्यांच्या अखत्यारित येतो. चित्रकला स्पर्धेच्या प्रमाणपत्रावर अतिरिक्त आयुक्तांची स्वाक्षरी होणार होती. सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी बैठका उरकून दालनात आले, त्या वेळी त्यांच्या सहायकाने प्रमाणपत्रे सहीसाठी आणली व कार्यक्रमास तातडीने द्यायची आहेत, असे सांगितले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी सह्या करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे कार्यक्रम सुरू केला. साडेपाचला सर्व प्रमाणपत्रे सही करून कार्यक्रमस्थळी नेण्यात आली. प्रमाणपत्र आणि प्रभाग समितीचे अध्यक्ष वेळेवर आले नसल्याने विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत बसावे लागले. प्रमाणपत्रे आल्यानंतर प्रभागाध्यक्ष केशव घोळवे, नगरसदस्या अनुराधा गोरखे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.