पिंपरीत दोनशे वाहने चोरणारे अटकेत; २ महिन्यात ४५० सीसीटीव्ही तपासून केली गुन्हयाची उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 01:27 PM2021-11-07T13:27:12+5:302021-11-07T13:27:19+5:30
आरोपीकडून तब्बल ३६ लाख रुपयांच्या ५१ दुचाकी हस्तगत केल्या
पिंपरी : दोनशे वाहनांची चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ३६ लाख रुपयांच्या ५१ दुचाकी हस्तगत केल्या. सतत दोन महिने तपास करून साडेचारशे पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करून पोलिसांनी गुन्ह्यांची उकल केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली.
शंकर भीमराव जगले (वय २०, रा. हारगुडे वस्ती, चिखली), संतोष शिवराम घारे (वय ३९, रा. ओझर्डे, ता. मावळ), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वाहनचोरीचे गुन्हे घडत असल्याने दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व कर्मचारी यांनी सतत दोन महिने तपास करून साडेचारशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच आरोपींची माहिती मिळवून वाहनचोरांचा शोध सुरू केला. तळेगाव दाभाडे येथे दोन संशयित येतात तसेच ते या भागातील राहणारे नाहीत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपी जगले व आरोपी घारे या दोघांना २६ ऑक्टोबरला पकडले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून ५१ दुचाकी, एक आटो रिक्षा, एक मोबाईल, असा मुद्देमाल जप्त केला.
वयाच्या सतराव्या वर्षापासून करतो वाहनचोरी
आरोपी संतोष घारे हा वयाच्या सतराव्या वर्षापासून वाहनचोरी करीत आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर व नाशिक येथे २०० वाहनचोरीचे गुन्हे आरोपी घारे याच्यावर दाखल आहेत. आरोपी शंकर जगले हा देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात तो २०१५ पासून फरार होता. त्याच्यावर दरोड्याचा प्रयत्न, वाहनचोरी, मोबाइल चोरी, घरफोडी, असे अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी दुचाकी चोरीसाठी मास्टर चावीचा वापर करीत असत. मौजमजेसाठी गाड्या चोरी करून ती वाहने गहाण किंवा विक्री करीत असत.