तासात दोनशे वाहने रोखली, रावेत-किवळे बीआरटी, तुकाराम मुंढेंनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:52 AM2017-10-19T02:52:37+5:302017-10-19T02:52:57+5:30
किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून बुधवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ये-जा करणा-या सुमारे २०० वाहनांना पीएमपीच्या सुरक्षा पथकाने अटकाव केला.
किवळे : किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून बुधवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ये-जा करणा-या सुमारे २०० वाहनांना पीएमपीच्या सुरक्षा पथकाने अटकाव केला. संबंधित वाहनांवर कारवाई करण्यासाठी संबंधित वाहनांची छायाचित्रे काढून व क्रमांक नोंदवून घेण्यात आले आहेत. गेल्या बुधवारपासून सलग तीन दिवस रावेत येथील महिलांनी केलेल्या आंदोलनाची व ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन माहिती दिल्यानंतर मुंढे यांनी सुरक्षा अधिकाºयांना प्रत्यक्ष पाहणीसाठी रावेत येथे पाठविले असल्याचे प्राजक्ता रुद्रवार व नगरसेविका संगीता भोंडवे यांनी सांगितले.
किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरील रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून वारंवार खासगी वाहने ये-जा करीत असून, त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी असणाºया चौकांत सतत अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन काहीही कार्यवाही करीत नसल्याने रावेत भागातील सेलेस्टियल सिटी सोसायटीमधील महिलांनी रस्त्यावर उतरत प्राजक्ता रुद्रवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवार ते शुक्रवार सलग तीन दिवस बीआरटी लेनमध्ये घुसखोरी करणाºया वाहचालकांविरुद्ध आंदोलन केले होते. नगरसेविका संगीता भोंडवे यांनीही उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा देत वाहने रोखण्यास सहकार्य केले होते. आंदोलनाच्या दुसºया दिवशी पोलीस दलाची एक मोटार, भारत सरकार लिहिलेली एक मोटार, कॉँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांची एक मोटार, तसेच मावळ पंचायत समितीच्या भाजपाच्या सदस्याची मोटारही महिलांनी बीआरटी लेनमधून जाऊ दिली नाही. विविध राजकीय पुढाºयांसह इतरांच्याही मोटारी व दुचाकी बीआरटी लेनमधून जाऊ दिल्या नव्हत्या. सुरुवातीला दोन दिवसांत साडेपाचशे वाहने रोखण्यात आल्याचे रुद्रवार यांनी सांगितले होते.
नगरसेविका भोंडवे, तसेच रुद्रवार यांनी मंगळवारी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची पुण्यातील कार्यालयात जाऊन भेट घेऊन रावेत येथील बीआरटीबाबत, तसेच बीआरटी लेनमधून बसव्यतिरिक जाणाºया वाहनांमुळे विविध चौकांत होणाºया अपघातांबाबत सविस्तर माहिती दिली होती.
लोकमतने प्रसिद्ध केलेली बातमी दाखविण्यात आली. वाहनांची घुसखोरी रोखण्याबाबत उपाययोजना करण्याबाबत पीएमपी प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार मुंढे यांनी बुधवारी सुरक्षा विभागाचे प्रमुख नंदकुमार जाधव यांनी किवळे ते रावेत दरम्यान बीआरटी मार्गावरील असुरक्षित चौकांची पाहणी केली.
पाच ते सहा जणांच्या पथकाने रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटीजवळच्या चौकात दोरी बांधून व वॉर्डन नेमून दुपारी साडेअकरा ते सव्वा वाजेपर्यंत दुचाकी व चारचाकी मोटारींवर कारवाई करून बीआरटी लेनमधून जाण्यास अटकाव केला. दुपारी बारा ते एक दरम्यान सुमारे दोनशे वाहनांचे क्रमांक नोंदवून घेण्यात आले.
संबंधित वाहनांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. याचा अहवाल वरिष्ठांना देण्यात येणार असून नोंदवून घेतलेले सर्व क्रमांक व छायाचित्रांच्या आधारे संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.