दोन अपघातांमध्ये रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू; मृत व्यक्तींची ओळख पटविण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 08:36 PM2022-09-14T20:36:56+5:302022-09-14T20:37:30+5:30
पहिली घटना देहूरोड ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान तर दुसरी घटना चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली
पिंपरी : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्येरेल्वेच्या धडकेत दोन अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झाला. पहिली घटना देहूरोड ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान सोमवारी (दि. १२) उघडकीस आली. तर दुसरी घटना चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान बुधवारी (दि. १४) दुपारी पावणेएकच्या सुमारास उघडकीस आली.
चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्टेशन दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन चिंचवड रेल्वे पोलिसांनी केले आहे. चेहरा उभट, अंगाने सडपातळ, उंची पाच फुट ३ इंच वय ३५ वर्षे असे मयताचे वर्णन आहे. उजव्या हातावर आई बाबा व त्रिशुल असे गोंधलेले आहे. डाव्यावर तलवारीचे चिन्ह गोंधलेले आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास चिंचवड रेल्वे पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवालदार मिलिंद गायकवाड यांनी केले आहे.
देहूरोड ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. अंदाजे ४० वर्षीय मयत पुरुषाच्या उजव्या हातावर जय मा शेरावाली तर डाव्या हातावर ओम असे चिन्ह गोंदलेले आहे. अंगात आकाशी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट, उंची पाच फूट पाच इंच, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, नाक सरळ, दाढी, मिशा, डोक्याचे केस वाढलेले आहेत. अशा वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हवालदार प्रशांत जाधव यांनी केले आहे.