मुंबई-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:08 AM2018-11-20T04:08:21+5:302018-11-20T04:08:45+5:30
मुंबई-पुणे महामार्गावर सिंहगड काॅलेजजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर सिंहगड काॅलेजजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नारायण गुंड (रा. कुसगाव) व महंमद (पूर्ण नाव आणि पत्ता समजू शकला नाही) यांचा अपघातात मृत्यू झाला, तर हरिभाऊ शिवराम काळे (रा. कुसगाववाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.
खंडाळा महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस. मंडले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिओ कंपनीची खाजगी प्रवासी बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्या मार्गावर सर्व्हिस लेनवर उभी होती. या गाडीमधून गुंड व काळे हे चिक्कीसाठीचे सामान डिक्कीतून काढत होते व क्लिनर महंमह हा गाडीच्या उभा राहून मागून येणार्या गाड्यांना दिशा दाखवत होता. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने या तिघांना धडक दिली. यामध्ये महंमद याचा जागीच तर गुंड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला काळे याची स्थिती देखील नाजूक आहे.
महामार्गावर वाहने उभी करण्यास मनाई असताना देखील सदर खाजगी प्रवासी वाहतूक करणारा बस चालक याने नियमांकडे दुर्लक्ष करत गाडी मार्गावर उभी करत सदरच्या दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. यामुळे अज्ञात वाहनचालकासह सदरच्या बस चालकावर गुन्हा दाखल करावा, असे मंडले यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळविले आहे.