पिंपरीत माजी सैनिकाची दोन लाखांची फसवणूक
By admin | Published: July 15, 2017 01:39 AM2017-07-15T01:39:53+5:302017-07-15T01:39:53+5:30
मिलिटरीच्या इलेक्ट्रॉनिक रिसर्च सेंटरचे रिटेंडरिंगचे काम माझ्याच हातात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मिलिटरीच्या इलेक्ट्रॉनिक रिसर्च सेंटरचे रिटेंडरिंगचे काम माझ्याच हातात आहे. त्यासाठी लागणारी एक मशिन दिल्लीवरून घ्या, असे सांगत एकाने उद्यमनगर येथील माजी सैनिकाची दोन लाख रुपयांना फसवणूक केली आहे. शिवचंद्र व्यंकटराव चिटणीस (वय ८४, रा. राधाकृष्ण कॉलनी, जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीगाव येथील विजय दिगंबर वराडे (वय ४५, रा. उद्यमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यांच्या फिर्यादीनुसार मिलिटरीचे इलेक्ट्रॉनिक रिसर्च सेंटरचे फेरनिविदेचे काम माझ्याच हातात आहे, असे सांगत मी तुम्हाला ते काम देतो. त्यासाठी तुम्ही दिल्लीहून रिलीज होणारे बॉम्ब इलेक्ट्रिक सर्किट चेक करण्याचे मशिन घ्यावे लागेल. ते मशिन दिल्ली येथे मिळेल. तुम्ही माजी सैनिक आहात. त्यामुळे तुम्हाला काम लगेच मिळेल, असे सांगत मशिनसाठी दोन लाख सहा हजार रुपये रोख भरावयास सांगितले. त्याप्रमाणे विजय यांनी त्यासाठी दोन लाख रुपये दिले. आरोपी शिवचंद्र याने ती रक्कम पोहोचल्याची रिफंडेबल डिपॉझिट बनावट पावती दिली.
हा फसवणुकीचा प्रकार सप्टेंबर २०१६ पासून सुरू होता. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.